सह्याद्री संवाद कार्यक्रमात यंदाचा ‘मोसमी पाऊस’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. केळकर यांनी मोसमी पावसाचे पूर्वानुमान, शेतीच्या दृष्टीने विपरित हवामान, हवामान बदल आणि विज्ञानाच्या मर्यादा या मुद्द्यांवर शेतकरी श्रोत्यांशी संवाद साधला. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी या व्याख्यानाचे औचित्य व सह्याद्री संवाद उपक्रमाविषयीची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी डॉ. केळकर म्हणाले, एखाद्या वर्षी पावसाळा लांबतो. दुसऱ्या वर्षी तो लवकर संपतो. भूतकाळात असे झाले आहे. भविष्यकाळातही होणार आहे. याचा अर्थ ऋतू बदलला आहे, असा होत नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते व तिच्या झुकलेल्या अक्षामुळे ऋतू निर्माण होतात. हवामान आणि ऋतुंच्या कालावधीचा संबंध नाही. ऋतुचक्र बिघडलं आहे, अशी विधानं करणं वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचं आहे. त्यांना काही आधार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपण शेतीमध्ये पिकांचे नवे प्रयोग करतो. काही वेळा ते यशस्वी होतात व अयशस्वी होतात. त्यासाठी हवामानाला दोष देणे योग्य नाही. आपली पीक पद्धत, वाणं तपासली पाहिजेत. तरुण शेतकऱ्यांनी हवामानाचा अभ्यास करून पीक पद्धती निवडावी, असा सल्ला त्यांनी दिला.
चौकट-
प्रगत किंवा पाश्चिमात्य देशांतील हवामानाचे किंवा पावसाचे अंदाज आणि आपले अंदाज याची नेहमी तुलना केली जाते. आपण त्यांचं कौतुक करतो. आपल्याकडचा मॉन्सून हे त्याचे उत्तर आहे. आपले हवामान वेगळे आहे. आपल्यासारखा पाऊस तिकडे नाही. त्या देशांतील वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे २४ तास ३६५ दिवस आगगाडीसारखे वाहात असतात. त्याचा अंदाज सोपा असतो. आपल्याकडे वारे खालून वर वाहतात. त्यामुळे ढग कुठे जाऊन पाऊस पाडेल ते सांगता येत नाही.