नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा उग्र रूप धारण केले असून, मार्च महिन्यात कोरोना बाधितांची संख्या आणि बळींच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागात रिक्त असलेल्या तब्बल ८७७ रिक्त पदांची पदभरती तातडीने करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयासह, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील रुग्णांना सर्वप्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात..या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देताना रुग्णांची सुश्रुषा करण्याचे दायित्व सिव्हिलमधील कर्मचारी निभावत आहेत; मात्र जिल्ह्यातील वर्ग १ आणि वर्ग २ मधील एकूण ७७ अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने कोरोनाच्या उद्रेकानंतरच्या कालावधीनंतर कर्मचाऱ्यांच्या नित्य कामकाजावर प्रचंड ताण येत आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात मुख्यत्वे ग्रामीण, आदिवासी आणि मनपा क्षेत्रातील नागरिक उपचारांसाठी दाखल होतात. त्यामुळे या रुग्णांना वेळेत सुयोग्य उपचार देण्याला जिल्हा रुग्णालयाकडून प्राधान्य देण्यात येते. शासकीय रुग्णालयात मुख्यत्वे स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, शल्यचिकित्सक, फिजिशियन, त्वचारोग, नाक-कान-घसा तज्ज्ञ, सोनोग्राफी, आयुष विभाग यांचा समावेश आहे. मात्र, ज्या प्रमाणात आरोग्य अधिकारी आणि विशेष डॉक्टर्सची गरज आहे, तेवढे उपलब्ध झालेले नाहीत. त्या तुलनेत केवळ तीन चतुर्थांश डॉक्टर्स आणि कर्मचारीच सध्या सेवा देत आहेत.
इन्फो
पुरेशा मनुष्यबळाचा अभाव
रुग्णसेवा अबाधित राहावी आणि तीदेखील उत्तमोत्तम देता यावी, यासाठी जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन, सोनोग्राफी यांचे आधुनिक यंत्र आणि तपासणी करणारे अनुभवी डॉक्टर कार्यरत असल्याने समस्येचे लवकर निदान होते. त्यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच रुग्णाला आवश्यक ते उपचार तातडीने उपलब्ध होतात. खासगी रुग्णालयांतील तज्ज्ञांपेक्षा जास्त सेवा जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ देतात. मोफत मिळणारी औषधे आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असली तरी डॉक्टरांचे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे या सुविधांच्या वापरावरही मर्यादा येतात.
इन्फो
मंजूर पदे २१२४; भरलेली पदे १२४७
जिल्ह्यात असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालय, सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, नगर परिषद रुग्णालये, पोलीस ॲकॅडमी, मध्यवर्ती कारागृह, पोलीस दवाखाना अशा एकूण ३७ रुग्णालयांसाठी २१२४ पदे मंजूर आहेत. त्यातील एकूण १२४७ पदांवर कर्मचारी भरती करण्यात आली आहे. मात्र, विविध पदांवरील तब्बल ८७७ आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
----
इन्फो चार्ट
आरोग्य विभागाची मार्चअखेरची स्थिती
पदाचे नाव मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
औषध निर्माण अधिकारी ११९ १०० १९
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ६९ ५३ १६
कुष्ठरोग तंत्रज्ञ ०७ ०७ ००
आरोग्य पर्यवेक्षक १९ ०९ १०
आरोग्य सेवक ५६९ ३५९ २१०
आरोग्यसेविका १०६९ ५३१ ५३८
आरोग्य सहायक १५१ १३३ १८
आरोग्य सहायिका १२१ ५५ ६६
----------------------------------------------------------------------
एकूण पदे २१२४ १२४७ ८७७
-------------------
(ही डमी आहे )