नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरू झालेला पावसाचा जोर सातत्याने दिवसभर कायम होता. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९१ मि.मि इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. यामुळे गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अधिक असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत होती. त्यामुळे सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेल्या विसर्गामध्ये रात्री ८ वाजेपर्यंत वाढ कायम होती. आठ वाजता एक हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने ७५०० क्युसेक पाणी नदीपात्रात प्रवाहित होते. गंगापूर धरणात पाच हजार ६३० दलघफू इतका जलसाठा असून धरण ८८ टक्के भरले आहे.नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ग्रामिण भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये विश्रांतीनंतर पावसाची विक्रमी नोंद झाली असून त्र्यंबकेश्वर तालुक्यात संध्याकाळपर्यंत ९१ मि.मि. इतका पाऊस झाला.
एकूणच धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे गंगापूर धरणसमुहातील गौतमी, काश्यपी, आळंदी या धरणांसह मुख्य गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. सकाळी अकरा वाजेपासून विसर्ग करण्यास सुरूवात करण्यात आली. प्रारंभी एक हजार क्युसेक त्यानंतर दोन तासांनी दोन हजार क्युसेक आणि दुपारी दोन वाजता ४६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नदीपात्रात धरणातून सध्या ४६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठालगत रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सुरू झालेल्या विसर्गामुळे नदीचा जलस्तर वाढला आहे. रामकुंडावरील अहल्यादेवी होळकर पूलाखालून सुमारे पाच हजार क्युसेक पाणी पुढे रामकुंडामध्ये प्रवाहीत होते. यामुळे गोदावरीवरील लहान पुल, लहान मंदिरे पाण्याखाली गेली. गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्याने सोमेश्वर मंदिराजवळील दुधसागर धबधबा खळाळला आहे. रविवारची सुटी असल्यामुळे नाशिककरांनी विशेषत: तरुणाईने धबधबा परिसरात गर्दी केली होती.