नाशिक : महानगरपालिका क्षेत्रातीस महापालिकेच्या व खासगी अनुदानित शाळांच्या संयुक्त प्रयत्नांतून ६ ते १४ वयोगटातील सुमारे ८८१ शाळाबाह्य विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत अनेक विद्यार्थी शाळेपासून दुरावले होते, त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी यावर्षी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहीमेतून ८८१ विद्यार्थी समोर आले अशले तरी १४ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी शिक्षण विभागाला विशेष प्रयत्न घ्यावे लागणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाल्याने विद्यार्थी शाळा आणि शिक्षण प्रवाहापासून दुरावले होते. काही कुटुंब कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा शहरात परतले. परंतु अशा कुटुंबातील विद्यार्थी पुन्हा शिक्षण प्रवाहात येऊ शकले नव्हते. अशा विद्यार्थ्यांची माहिती घेत महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांनी तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी गटा गटाने त्यांच्यासाठी अभ्यासवर्ग चालवून त्यांना पुन्हा शिक्षण प्रवहात आणले. परंतु कोरोनामुळे अनेक कुटुंबावर आर्थिक संकट ओढाल्याने १४ ते १५ वर्ष वयापेक्षा अधिक वयोगटातील मुले शाळांपासूनही अजूनही दुरावलेली आहेत. त्यांना पुन्हा शिक्षणप्रवाहात सामावून घेण्याचे आव्हान शिक्षणविभागासमोर आहे.
मनपा व इतर खासगी अनुदानित शाळांनी ६ ते १४ वयोगटातील ८८१ शाळाबाह्य विद्यार्थी शाळांमध्ये दाखल करुन शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहेत, यात ३ ते ६ वयोगटातील बालके अंगणवाडी, बालवाडी मध्ये दाखल होणे आवश्यक आहेत. तसेच १४ ते १८ वयोगटातील विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी दाखल करुन घेणे आवश्यक आहे, तरच या शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहिमेचा खऱ्या अर्थाने उद्देश सफल होईल. सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी नाशिक महापालिका