नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल (दि.१९) मतदान होऊन ‘अ’ गटासाठी १०५७ पैकी १०३१, तर ‘ब’ व ‘क’ गटासाठी असलेल्या ४६५५ पैकी ४५०७ मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘अ’ गटासाठी ९८ टक्के, तर ‘ब’ व ‘क’ गटासाठी मिळून ९६ टक्के, तर एकूण ९७ टक्केमतदान झाले. गुरुवारी (दि.२१) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. पहिला पाच तालुक्यांतील ‘अ’ गटांसाठी पाच संचालक पदांचा निकाल अवघ्या १५ ते २० मिनिटांत लागण्याची शक्यता असून, त्यानंतर ‘क’ वर्गाच्या एका जागेसाठीची मतमोजणी व नंतर ‘ब’ गटासाठी पाच राखीव जागांसाठी दहा टेबलांवर मतमोजणी होणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश खरे यांनी दिली. सकाळी ८ वाजेपासूनच शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयातील तीन मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ झाला. नाशिक तालुका संचालक पदाच्या ‘अ’ गटासाठी ६६ पैकी ६५ मतदान झाले. नरेंद्र पेखळे नामक मतदाराला मतदानासाठी येता आले नसल्याची चर्चा आहे. सकाळीच पावणे अकराच्या सुमारास राजाराम धनवटे नाशिक तालुका ‘अ’ गटाच्या मतदानासाठी जात असताना चुंबळे गटाच्या समर्थकांनी त्यांना थांबवून त्यांच्याशी चर्चा सुरू केली. हे पाहताच नगरसेवक गोकुळ पिंगळे तसेच उमेदवार माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी तेथे धाव घेतली. याच वेळी तेथे उपस्थित असलेल्या चुंबळे व पिंगळे गटाच्या समर्थकांमध्ये बाचाबाची होऊन गोकुळ पिंगळे यांचा शर्ट फाटल्याचे कळते. त्यानंतर बाचाबाची सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने त्यात चुंबळे समर्थक अजिंक्य चुंबळे यास पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद मिळाल्याचे समजते. घटनास्थळी जास्त पोलिसांची कुमक येऊन तणाव निवळला. यावेळी तिन्ही पॅनलचे नेते व उमेदवार उपस्थित होते. त्यात आमदार सीमा हिरे,आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार बाळासाहेब सानप, आमदार अपूर्व हिरे, माजी खासदार देवीदास पिंगळे. जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे, अॅड, राहुल ढिकले, माजी आमदार वसंत गिते, नरेंद्र दराडे, सुनील बागुल, विजय करंजकर, दत्ता गायकवाड, डॉ. दिनेश बच्छाव, नाना सोनवणे, परवेज कोकणी, महापौर अशोक मुर्तडक, वंदना मनचंदा, वत्सला खैरे, संपत जाधव, सचिन ठाकरे, मुरलीधर पाटील, जगदीश होळकर, वैशाली कदम आदि उपस्थित होते. त्यानंतर दुपारपर्यंत नाशिक तालुका ‘अ’ वर्गासाठी असलेले ६६ पैकी ६५ मतदान झाले. (प्रतिनिधी)
जिल्हा बॅँकेसाठी ९७ टक्के मतदान; चुंबळे-पिंगळे गटात बाचाबाची
By admin | Published: May 20, 2015 1:28 AM