नाशिक : नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यात लकी ड्रॉ योजना सुरू करून सभासदांना प्रतिमाह १ लाखापासून ते २५ हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याचे आमिष दाखवून नऊ हजार ७०० सभासदांकडून ९ कोटी ११ लाख ८० हजार रुपये जमा करून घेत बक्षीस न देता फसवणूक करणाºया ‘माँ गायत्री मार्केटिंग’च्या अकरा संचालकांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे संचालकांनी फसवणूक केलेल्या नागरिकांनी ‘लोकमत’कडे आपली कैफियत मांडल्यानंतर त्यांची व्यथा मालिकेद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती़ अखेर सभासदांनी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे धाव घेतल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि़२४) सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला़ सरकारवाडा पोलीस ठाण्यात उमेश रामदास सिरसाठ (४१, रा़मेशी, ता़देवळा, जि़नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ठक्कर बाजारमधील जीएफ १४ मध्ये कार्यालय असलेल्या ‘माँ गायत्री मार्केटिंग’चे संचालक संशयित प्रद्युम्न भगवंतराव गावंडे, शरद भगवान पाटील, भरत यशवंत पाटील, सारंग यादव पानसरे, विजय रामदास कदम, राहुल राजेंद्र बोरसे, विजय पुंडलीक पाटील, भूषण रामचंद्र भोळे, विजय मधुकर कोळी, मनोज रघुनाथ कोळी, अनिल नवनाथ शिंदे यांनी ५ एप्रिल २०१६ ते २० जून २०१७ या कालावधीत लकी ड्रॉच्या नावाखाली ९ हजार ९९९ सभासद गोळा करून या १५ महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक सभासदाकडून ९ हजार ४०० रुपये गोळा केले़ प्रतिमहिना लकी ड्रॉ काढून एक लाखांपासून ते २५ हजार रुपयांचे बक्षिसाचे आमिष व शेवटी बक्षीस न मिळालेल्या ९ हजार ७०० सभासदांना क्राऊन कंपनीचा २२ इंची एलइडी टीव्ही देण्याचे आमिष दाखविले़ त्यामुळे सिरसाठ व त्याच्यासारख्या अनेकांनी एजंट होऊन नागरिकांकडून पैसे गोळा करून संचालकांकडे दिले़ मात्र, लकी ड्रॉ काढून सभासदांनी बक्षिसांचे वाटप केल्यानंतर उर्वरित ९ हजार ७०० सभासदांनी संचालकांना टीव्हीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व कार्यालयही बंद केले़ यामुळे सभासदांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संचालकांविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे़ टाळाटाळ गायत्री मार्केटिंगने फसवणूक केलेले सभासद गत चार-पाच दिवसांपासून गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चकरा मारीत होते़ मात्र त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला जात नव्हता शेवटी या प्रकरणात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पोलिसांना फोन केल्यानंतर तसेच सभासदांनी ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सभासदांनी सांगितले़
‘माँ गायत्री मार्केटिंग’‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली नऊ कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:26 AM