नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण विभागाने सोमवारी (दि़१३) नाकाबंदी करून पकडल्या़ सुरगाणा तालुक्यातील चिचपाडा वनविभागाच्या चेक नाक्यावर नाकाबंदी करून पकडला़ कारसह सुमारे नऊ लाखांचा हा मद्यसाठा असून, या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे़
नाशिक जिल्ह्यात गुजरात राज्याच्या सीमेलगतच्या भागामध्ये दमण राज्यात निर्मित तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक केली जाते़ नाशिक विभागाचे उपआयुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक सी़ बी़ राजपूत यांनी बेकायदेशीर मद्य वाहतूक रोखण्याबाबत आदेश दिले होते़ त्यानुसार कळवण विभागाचे निरीक्षक आऱ एस़ सोनवणे व दुय्यम निरीक्षक डी़ डी़ चौरे, जे़ बी़ चव्हाणके यांना मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार सोमवारी सुरगाणा तालुक्यातील चिचपाडा येथील वनविभागाच्या चेक नाक्यावर नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्यात आली़
या नाकाबंदीत वाहनांची तपासणी करीत असताना स्विफ्ट कार (डीएन ०९, जी २६३८) व सॅन्ट्रो कारची (डीएन ०९, जी २६३८) तपासणी केली असता त्यामध्ये केवळ दमन व दादरा नगरहवेलीमध्ये विक्रीसाठी परवानगी असलेले जॉन मार्टिन प्रीमिअम व्हिस्कीच्या १८० मिलिचे २७ बॉक्स (१२९६ बाटल्या) व हॅवर्डस ५००० स्ट्राँग बिअरचे ५०० मिलिचे २३ बॉक्स (५५२ बाटल्या) आढळून आल्या़ या प्रकरणी संशयित रितेश रमेश पटेल (रा़ दमण) व गणेश परसू महाला (रा़ गुजरात) या दोघांना अटक करण्यात आली आहे़
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी दोन कार व मद्यसाठा असा ८ लाख ८४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ सहायक दुय्यम निरीक्षक पंडित जाधव, जवान संतोष कडलग, अवधूत पाटील, पांडुरंग वाईकर, गणेश शेवगे यांनी ही कारवाई केली़