वडनेरभैरव : लॉकडाउनच्या काळात दारू दुकाने बंद असल्याने अवैध दारू विक्रीला ऊत आल्याचे निदर्शनास येत आहे. वडनेरभैरव शिवारात अवैध विक्री होत असल्याचे समजताच पोलिसांनी गावठी दारूचे १२ अड्डे उद्ध्वस्त केले असून, एक लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.वडनेरभैरव शिवारातील कोकणटेंभी, वरचा कोळीवाडा, खालचा कोळीवाडा, वडारवाडी या परिसरात गावठी दारू गाळण्याच्या हातभट्ट्या मोठ्या प्रमाणात लावण्यात येत असून, त्या दारूची परिसरात अवैध विक्री केली जात आहे.याबाबतची गुप्त माहिती सहायक पोलीस निरीक्षक जी.सी. गुरव यांना मिळताच त्यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक उगले, इंद्रेकर, हवालदार वाळके, क्षीरसागर, वाघ, कराड, भोये, मधुर पवार व गणोरे आदींच्या पाच टीम तयार केल्या. बुधवारी (दि. २९) पहाटे साडेचार वाजता धाड टाकण्याच्या कारवाईला सुरुवात केली.याप्रकरणी शांताबाई गोडे, विद्या गोडे, सुरेखा पिंपळे, कल्पना जाधव, लक्ष्मी गायकवाड, विठाबाई पवार, अरुण पवार, शांताबाई जाधव, अलका मोरे, मनोज जाधव, अशोक गुंजाळ, बबलू जाधव (सर्व रा. वडनेरभैरव) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात येत आहे.
वडनेरभैरवला गावठी दारूचे ९ अड्डे उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 8:59 PM