नाशिक : आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशप्रक्रियेसाठी ५ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, आचापर्यंत जिल्हाभरातून नऊ हजार ८६८ पालकांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज आॅनलाइन पोर्टल व मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून दाखल केले आहे. जिल्ह्यात यावर्षी ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७६४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, त्यासाठी पालकांना २२ मार्चपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.आरटीई प्रवेशप्रक्रिया यंदा तब्बल दोन महिने उशिराने म्हणजे ५ मार्चला सुरू झाली असू या प्रवेशप्रकियेसाठी २२ मार्चपर्यंत आॅनलाइन पोर्टल तसेच मोबाइल अॅपच्या माध्यमातून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. मागील दोन आठवड्यात संकेतस्थळावरून ९ हजार ८६८, तर मोबाइल अॅपवरून १५ अर्ज असे एकूण ९ हजार ७१२ अर्ज दाखल झाले आहेत. आरटीई प्रवेशासाठी मागील वर्षी ४६६ शाळांमध्ये सहा हजार ५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी जवळपास ११ हजार अर्ज आले होते. यंदाही मुदतीअंति जवळपास तेवढेच अर्ज प्राप्त होतील, असा अंदाज शिक्षण विभागाने वर्तविला आहे. गतवर्षी प्राप्त अर्जांतून चार प्रवेश फेऱ्यांमध्ये ७ हजार १०८ बालकांची लॉटरी लागली होती. त्यापैकी चार हजार ६४६ बालकांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला होता. यंदाच्या शैक्षणिक वषार्साठी ५ ते २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यानंतर प्रवेशप्रक्रियेसंदर्भात पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.नाशिकमध्ये मोबाइल अॅपला अत्यल्प प्रतिसादशिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी आॅनलाइन संकेतस्थळोसोबतच पालकांना घर बसल्या अर्ज भरता यावा, या उद्देशाने मोबाइल अॅपही सुरू केले आहे. मात्र, आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण ९ हजार ८६८ अर्जांपैकी केवळ १५ अर्ज मोबाइल अॅपद्वारे प्राप्त झाले आहे, तर आॅनलाइन पोर्टलवरून ९ हजार ८५३ अर्ज दाखल झाले आहे. यावरून नाशिकमध्ये मोबाइल अॅपला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
आरटीई अंतर्गत ९ हजार ८६८ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:05 AM