नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील मोबाइलच्या दुकानात घरफोडी करून विविध कंपन्यांचे ९० मोबाइल चोरणाºया चौकडीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ या चौकडीमध्ये शहानवाज ऊर्फ शानू अश्पाक शेख (वय २३, रा. भगूर), फईम ऊर्फ बबन अश्पाक शेख (वय ३३, रा. भगूररोड), सागर मुन्ना सोळंखी (वय ३०, रा. देवळाली कॅम्प) आणि निखील विजय गलोत (रा. जुनी स्टेशनवाडी) अशी घरफोडीतील संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून चोरी केलेले ९० मोबाइल व रिक्षा असा सुमारे चार लाखांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़ देवळाली कॅम्प जुना बसस्टॉप परिसरातील मोबाइल विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे मोबाइल चोरून नेल्याची घटना गतवर्षी घडली होती़ या मोबाइल चोरीचा तपास पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर व सहायक पोलीस आयुक्त रवींद्र नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता़ शहर गुन्हे शाखा युनिट एकमधील हवालदार रवींद्र बागुल यांना या घरफोडीतील संशयितांबाबत माहिती मिळाली होती़ वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या सखोल चौकशीत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला़ गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दीपक गिरमे, सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख, हवालदार संजय मूळक, शिपाई गणेश वडजे, स्वप्नील जुंद्रे, विशाल देवरे, दीपक जठार यांच्या पथकाने ही कारवाई केली़ मोबाइल दुकानावर पाळत ठेवून या चौघांनी दुकान फोडले व चोरी केलेल्या मोबाइलची विक्री केली होती़ पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी तांत्रिक शाखेच्या मदतीने या मोबाइलचा तपास करून गुन्हे शाखेस सहकार्य केले व चौघांचे बिंग फुटले़ या संशयितांकडून ९० मोबाइल, मोबाइल अॅक्सेसरिज व गुन्ह्यातील रिक्षा असा चार लाखांचा मुद्देमालही जप्त केला़
घरफोडीतील टोळीकडून ९० मोबाइल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:10 AM