नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी स्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी छत्रपती सेनेच्यावतीने गेल्या महिनाभरात जवळपास ९० टॅँकरने सुमारे पाच लाख लिटरपर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. राज्यभरातही ४० टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांनी दिली आहे.जिल्ह्यात दुष्काळाची भयावहता लक्षात घेऊन छत्रपती सेनेने अनेक गावांची टॅँकरद्वारे पिण्याची पाण्याची तहान भागविली आहे. कोणतेही प्रायोजक नसतानाही छत्रपती सेनेने स्वखर्चाने जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील ३५ गावांना पाणीपुरवठा केला आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील गावांना १५ टँकर , चांदवड तालुक्यातील तिसगाव येथे व गावाजवळील वस्त्या पाडे येथे १८ टँकर , पेठरोड कडे ६ टँकरने पाणीपुरवठा केला आहे. याशिवाय, सातपूर येथे पेठ हरसूल येथून स्थलांतरित झालेले शेतकरी आणि शेत मजूर यांच्यासाठी १० टॅँकरने पाण्याचा पुरवठा केलेला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुंदर नगर , मेटघर किल्ला , गंगाद्वार जवळील गावे या भागात ६ टँकर पुरविण्यात आले. जिल्ह्यात ९० टॅँकरने पाणीपुरवठा केला असून राज्यात अमरावती, जालना येथील गावांनाही पाणीपुरवठा करण्यात आला आहे. निलेश शेलार यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे कार्य संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार ,कोर टीम अध्यक्ष तुषार गवळी , कोर टीम उपाध्यक्ष राजेश पवार यांचेसह सदस्य नेटाने पुढे नेताना दिसून येत आहे.
छत्रपती सेनेच्यावतीने जिल्ह्यात ९० टॅँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 4:02 PM
सामाजिक बांधिलकी : अनेक गावांची भागविली तहान
ठळक मुद्दे राज्यात अमरावती, जालना येथील गावांनाही पाणीपुरवठा करण्यात आला आहे