नाशिक : कॅनडाकार्नरवरील मलबार गोल्ड नावाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानात दोन बुरखाधारी महिला ग्राहक खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या. त्यापैकी एका महिलेने सेल्समनला गप्पा करत गुंतवून ठेवले, तर त्याचवेळी दुसऱ्या साथीदार महिलेने हातचलाखी करत ३० ग्रॅम ६४० मि.ली ग्रॅम वजनाची सुमारे ९० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मलबार गोल्ड प्रा.लि., या दुकानात दोन बुरखाधारी महिला बांगड्या घेण्याच्या बहाण्याने आल्या आणि सेल्समनसोबत बांगड्या खरेदीबाबत गप्पा सुरू करत विविध बांगड्या दाखविण्यास सांगितले. याचवेळी पांढरा स्कार्फ बुरख्यावर परिधान केलेल्या महिलेने रॉडमध्ये अडकविलेल्या बांगड्यांपैकी एक बांगडी अलगद काढून बुरख्याआड लपविली. यानंतर सुमारे सहा ते आठ मिनिटे या महिला दुकानात बसून राहिल्या. त्यानंतर हळूच काढता पाय घेतला. त्यांचा हा प्रताप दुकानातील तिस-या डोळ्याने (सीसीटीव्ही) टिपला. पांढरा स्कार्फ घातलेली महिला सुरुवातीलाच बांगड्यांच्या ट्रेमधील बांगड्यांचा एक रॉड हातात घेते आणि त्या रॉडमधील एक बांगडी हळूच काढून बुरख्यात लपविताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते.रात्रीच्या वेळी दुकानामधील दागिन्यांची मोजणी करत असताना एक बांगडी कमी असल्याचे व्यवस्थापक मुकुंद रामकृष्ण कळसकर (२८, रा.हिरावाडी) यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ संपूर्ण दालनाची झाडाझडती उपस्थित कर्मचा-यांच्या मदतीने सुरू केली; मात्र बांगडी आढळून आली नाही. यावेळी संशयित बुरखाधारी महिलांना ज्या सेल्समनने बांगड्या दाखविल्या त्याच्या मनात शंकेची पाल उशिरा का होईना चुकचुकली आणि त्यांनी त्याबाबत कळसकर यांना सांगितले. यावेळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये महिलांची चोरी लक्षात आली. कळसकर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन सगळी हकिगत सांगून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले आहे. कळसकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात बुरखाधारी महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे. याबाबत पुढील तपास हवालदार राठोड करीत आहेत.
बुरखाधारी महिलांकडून खरेदीच्या बहाण्याने ९० हजाराची बांगडी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 5:50 PM
३० ग्रॅम ६४० मि.ली ग्रॅम वजनाची सुमारे ९० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ठळक मुद्देसीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले रॉडमधील एक बांगडी हळूच काढून बुरख्यात लपविताना सीसीटीव्हीत दिसते