बुधवारी आरोग्य विभागाच्या उपसंचालक रत्ना रावखंडे यांनी लसीकरण मोहिमेचा आढावा घेत लसीकरण टीममध्ये वाढ करा तसेच दूरवरच्या व कानाकोपऱ्यात लसीकरण करण्यासाठी मोबाईल टीम तयार करुन येत्या २५ जानेवारी पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. येथील सामान्य रुग्णालयात बुधवारी गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेबाबत आढावा बैठक झाली. शहरातील शून्य ते पंधरा वय वर्ष गटातील १ लाख ९३ हजार बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ३ हजार बालकांना डोस देण्यात आला आहे. ५७ टक्के काम पूर्ण झाले आहे. ९० हजार बालके लसीकरणापासून वंचित आहेत. शहरातील काही भागात लसीकरणाला विरोध झाला आहे. तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री दीपक सावंत यांनी मौलाना-मौलवींची धावती भेट घेऊन लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. तरी देखील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक रावखंडे यांनी येत्या २५ जानेवारीपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. आतापर्यंत ५६ टीम काम करीत होत्या आता ७१ टीमद्वारे १ हजार लाभार्थी असलेल्या १५ व ५०० लाभार्थी असलेल्या ३२ शाळांमधील ६४ हजार विद्यार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे तर उर्वरित शाळाबाह्य व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी, कानाकोप-यात राहणा-या बालकांसाठी मोबाईल टीम तयार करण्यात आली आहे. शहरातील वैद्यकीय अधिका-यांचीही मदत घेण्याच्या सूचना रावखंडे यांनी केल्या.बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. भीमराव त्रिभुवन, डॉ. किशोर डांगे, डॉ. महाले व आरोग्य सेवक उपस्थित होते.
९० हजार बालके गोवर-रुबेला लसीकरणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 5:15 PM