अंदरसूल : येवला तालुक्यातील बोकटे गावात काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली होती. त्यात काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते, म्हणून दिवाळीत होणारी गर्दी लक्षात घेता, बोकटे ग्रामपंचायतीने शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे कवच कुंडल अभियानांतर्गत गावात ९० टक्के लसीकरण पूर्ण केले.
या अभियानात बोकटे येथील सरपंच प्रताप दाभाडे, ग्रामसेवक भाऊराव मोरे, तलाठी अश्विनी शेंडे, पोलीसपाटील सुरेश दाभाडे, आरोग्य विभागाचे कर्मचारी, बोकटे येथील आशा कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन लसीकरण केले. यात काही ग्रामस्थ कामानिमित्त बाहेरगावी व काही आजारी असलेले ग्रामस्थ वगळता ९० टक्के लसीकरण पूर्ण केले म्हणून बोकटे ग्रामपंचायतीच्या वतीने अभियानात योगदान देणाऱ्या आशा कर्मचारी यांना दिवाळी भेट म्हणून पैठणी देऊन बोकटे ग्रामपंचायतीत गौरविण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, बोकटे ग्रामपंचायत सरपंच प्रताप दाभाडे, पोलीसपाटील सुरेश दाभाडे, ग्रामपंचायत उपसरपंच साधना काले, सदस्य विलास दाभाडे, अरुण मोरे तसेच सखाहरी दाभाडे, हितेश दाभाडे, विजय दाभाडे, पोपट दाभाडे, सर्जेराव बागल, विजू दाभाडे, जावेद पठाण, सविता दाभाडे, राणी शेवाळे, मंगला कुऱ्हाडे, बाळासाहेब मोरे, किरण साळवे, मयूर शिंदे आदी उपस्थित होते.