नायलॉन मांजा विक्री व वापरावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी बंदी जाहीर केली आहे; मात्र तरीदेखील चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी येत असल्याने पोलिसांनी गुप्त माहिती काढत कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे पथक गुरुवारी (दि. ७) मांजा विक्रेत्यांची झाडाझडती घेत असतानाच शिपाई मुक्तार शेख यांना सूचितानगर येथील एका फ्लॅटमध्ये राजरोज नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी दीपहंस अपार्टमेंट गाठले. नायलॉन मांजाने भरलेले गट्टू (फिरकी) पोलिसांच्या हाती लागल्या. फ्लॅट नं. ५ मध्ये बंदी असलेला मांजा एक अल्पवयीन मुलगा विक्री करीत होता. घटनास्थळावरून नायलॉन मांजाने भरलेले सुमारे ३२ हजार २०० रुपये किमतीचे ६२ नग गट्टू पोलिसांनी हस्तगत केले असून याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित अल्पवयीन मुलाला मुंबई नाका पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
युनिट १ च्या पथकाने सुमारे ७३ हजार रुपये किमतीच्या ७३ गट्टू मागील दोन कारवायांमध्ये हस्तगत केले आहेत.
सातपूर पोलीस ठाणे हद्दीत नायलॉन मांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट दोनच्या पथकाने पिंपळगाव बहुला येथे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास छापा मारून धनराळे यास अटक केली. त्याच्या ताब्यातून १९ हजार ४०० रुपये किमतीचे २९ रीळ हस्तगत करण्यात आले. संशयित धनराळेविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
...