नाशिक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ९२.८५ टक्के मतदान झाले असून, सोमवारी (दि. १४) मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत २१ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात असून, त्यासाठी जिल्ह्यातील दहा हजार १४७ सभासदांपैकी नऊ हजार ४२१ सभासदांनी रविवारी (दि. १३) मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत प्रामुख्याने सत्ताधारी प्रगती पॅनल विरोधी समाज विक ास पॅनलमध्ये परस्परविरोधी लढत रंगल्याने यावर्षीच्या निवडणुकीत चुरस आहे.विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांच्याविरोधात नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा विद्यमान सभापती नितीन ठाकरे यांच्यात यंदा काट्याची लढत झाली. दोन्ही पॅनलच्या माध्यमातून संस्थेचे पदाधिकारी परस्पर विरोधी उभे ठाकल्याने दोन्ही पॅनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.मविप्रसाठी रविवारी (दि. १३) सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रांवरील ४८ बुथवर काही अपवाद वगळता मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. त्यासाठी ५५० कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. संस्थेचे एकूण दहा हजार १४७ आजीव सभासद असून, त्यापैकी सुमारे ९२.८५ टक्के म्हणजेच नऊ हजार ४२१ सभासदांनी रांगा लावून मतदान केले. नाशिक शहरातील आजीव सभासदांनी केटीएचएम महाविद्यालयात मतदान केले, तर ग्रामीणसाठीचे मतदान अभिनव शाळेत झाले. इतर सर्व मतदान प्रत्येक तालुक्यातील मतदान केंद्रावर घेण्यात आली. सेवकांतून निवडून येणाºया तीन उमेदवारांसाठी केवळ नाशिकमध्ये केटीएचएम महाविद्यालयातील मतदान केंद्रात मतदानप्रक्रिया घेण्यात आली. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी केटीएचम महाविद्यालयाच्या जीमखाना विभागात होणार आहे. दरम्यान, दुपारी रावसाहेब थोरात सभागृहात संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून यात नूतन पदाधिकाºयांचा सत्कार होऊन नवीन कारभारी पदभार स्वीकारणार आहे. परंतु, यावेळी झालेली चुरशीची निवडणूक लक्षात घेता सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
'मविप्र'ला ९३ टक्के मतदान : सोमवारी फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 9:00 PM