नाशिक : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या खरीप पीककर्जात मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९५९ कोटींचे अधिक कर्जवाटप करण्यात आले आहे. गत चार वर्षातील हा खरीप पीककर्ज वितरणाचा उच्चांक असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा पतपुरवठा योजनेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी बॅंक्स अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लीड डिस्ट्रिक मॅनेजर अर्धेंदू शेखर, एसबीआय बॅंकेचे क्षेत्रिय सहायक महाप्रबंधक सफल त्रिपाठी, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, एनडीडीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पिंगळे यांच्यासह इतर बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले की, मागील चार वर्षांचा शेती कर्जाचा आढावा घेतला असता २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ९५९ कोटी रुपयांनी अधिक पीककर्ज वितरण झाले आहे. जिल्ह्यात पीककर्ज वितरणात वाढ झाली असली तरी जिल्ह्यात शेतीची मुबलक कामे असल्याने त्यात वाढीचीदेखील शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेवर करून किंवा नूतनीकरण करून व्याज परताव्याचा लाभ घेतला पाहिजे. ज्यामुळे जिल्ह्यातील पतपुरवठ्यास चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.
--काेट--
जिल्ह्याच्या पीककर्जाची आवश्यकता लक्षात घेता बँकांनी वास्तववादी लक्ष्य निश्चित केले पाहिजे. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी सूक्ष्म विश्लेषण करण्यासाठी ते प्रभावी ठरेल. हे उद्दिष्ट लागवडीखालील जमीन आणि पिकाच्या उत्पादनास चालना देणारे व शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासाठी प्रेरित करणारे असावे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.