नाशिक : शहरात अकरावीसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी’ पद्धतीने १३ जानेवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेत जवळपास ९६ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहे. यात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या ५ विद्यार्थ्यांसह ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या ९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. दुसऱ्या टप्प्यात ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात असून सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील मुदत संपणार आहे.
नाशिक शहरातील अकरावीच्या रिक्त राहिलेल्या जागांसाठी १३ जानेवारीपासून ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम संधी’ नियमानुसार विशेष फेरी राबवण्यात येत आहे. प्राधान्य फेरीसाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेप्रमाणे सात गट करण्यात आले असून ९० टक्क्यांपासून उतरत्या क्रमाने विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जात आहे. आतापर्यंत प्रवेश निश्चित न झालेले विद्यार्थी प्राधान्य फेरीसाठी पात्र ठरणार असून रिक्तजागांनुसार नोंदविलेल्या पसंतीक्रमानुसार मिळालेल्या महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी फेरीतील दुसरा टप्पा सोमवारी संपणार असून मंगळवार (दि.१९)पासून तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश सुरू होणार आहे. या टप्प्यात ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱे विद्यार्थी प्रवेश निश्चित करू शकणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
---------
प्राधान्य फेरीचे वेळापत्रक
- १९ व २० जानेवारी : ७० टक्क्यांपेक्षा जास्त
-२१ जानेवारी : ६० टक्क्यांपेक्षा जास्त
- २३ जानेवारी : ५० टक्क्यांपेक्षा जास्त
- २७ व २८ जानेवारी : उर्वरित उत्तीर्ण विद्यार्थी
- २९ जानेवारी : एटीकेटी विद्यार्थी