नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच शहर व परिसरात किरकोळ व मध्यम आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. उंटवाडी येथील नंदीनी नदीच्या काठावर बहरलेल्या बांबूची वृक्षसंपदा मंगळवारी (दि.२९) आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीचे स्वरुप मोठे असल्यामुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने अतिरिक्त दोन बंबांसह जवानांना पाचारण करण्यात आले. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यास यश आले.मंगळवारी (दि.२९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या मुख्यालयाला बांबूच्या झाडांना आग लागल्याची माहिती मिळाली. तत्काळ उंटवाडी येथील म्हसोबा मंदिराच्या परिसरात सातपूर उपकेंद्राचा बंब रवाना करण्यात आला. जवानांनी आगीचे स्वरुप बघून व वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे आग वेगाने पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता तत्काळ अतिरिक्त मदतीची मागणी शिंगाडा तलाव येथील मुख्यालयाकडे केली. तत्काळ मुख्यालयातून दुसऱ्या बंबासह जवान घटनास्थळी पोहचले. दोन बंबांमधील पाण्याचा मारा करत बांबूच्या झाडांना लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला,मात्र आग आटोक्यात येत नसल्याने सिडको उपकेंद्राचीही मदत बोलविण्यात आली. तीन बंबांच्या सहाय्याने जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत तासाभरात आग विझविली. धुराचे लोट आकाशात उंचच उंच उठल्याने यावेळी रस्त्यावर बघ्यांनी गर्दी केली होती. या आगीमध्ये नदी काठालगत बहरलेल्या बांबूवनाची मोठी हानी झाली. या आगी मागील नेमके कारण समजू शकलेले नाही. नशा करणाऱ्या व्यक्तींनी आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.वडाळ्यात पडीक गुदामात भडकावडाळागावात सावता माळी रस्त्यावर पडीक स्वरुपात असलेल्या एका गुदामाच्या जागेत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाला अचानकपणे आग लागली होती. यावेळी धुराचे मोठे लोट उठले होते. सुदैवाने या गुदामाच्या जागेला पक्क्या भिंतीचे बांधकाम केलेले कूंपन असल्यामुळे आग आजूबाजूला पसरली नाही.
या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सिडको उपकेंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करत येथील आग विझविली. ही पडीक जागा कचरा डम्पिंग डेपो बनला आहे. याठिकाणी मृत जनावरे, आजूबाजूच्या मांस विक्रेत्यांकडून देखील याठिकाणी टाकाऊ पदार्थ आणून टाकले जातात. यामुळे महापालिका प्रशासन संबंधित जागा मालकाला नोटीस बजावणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.