नाशिक : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होऊ नयेत म्हणून ओबीसी व व्हीजेएनटी यांची लोकसंख्या निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने गठित केलेल्या समर्पित आयोगाचा राज्यभर विभागस्तरावर भेटींचा कार्यक्रम जाहीर झाला असून, हा आयोग रविवार (दि. २२) रोजी नाशिक विभागीय दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात आयोग चार जिल्ह्यांतील नागरिक व या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांची निवेदने स्वीकारणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी अवघ्या दोन तासांचा वेळ दिला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, शहरी क्षेत्रातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाला म्हणजे ओबीसी, व्हीजेएनटी यांना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे. या आयोगाने राज्यातील या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना व नागरिकांची मते जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून दि. २१ मे ते २८ मे या कालावधीत राज्यातील विविध विभागांत भेटीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार रविवार (दि. २२) रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सायंकाळी साडेपाच ते साडेसात यावेळेत आयोग भेट देणार आहे.
चौकट===
अगोदरच करावी लागणार नावनोंदणी
या क्षेत्रात काम करणाऱ्या नाशिक विभागांतर्गत असलेल्या नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांतील ज्या सामाजिक संघटना व नागरिकांना आपली मते व निवेदने आयोगासमोर सादर करावयाची आहेत, त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड येथे आयोगाच्या भेटीअगोदर नावनोंदणी करण्याचे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.