नरेंद्र दंडगव्हाळ, सिडको : दारूची पार्टी करताना झालेल्या शुल्लक कारणावरून बालपणाचे मित्र असलेल्या दोघांमध्ये वाद झाले. यावेळी नशेत झिंगल्याने एकाने फरशीचा तुकडा मित्राच्या डोक्यात टाकला. गंभीर दुखापत होऊन रक्तबंबाळ झाल्याने आनंद इंगळे (३२,रा. कामटवाडे) याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड गस्ती पथकाने धाव घेतली. घटनास्थळावरून आरोपी आनंद आंबेकर (२८) यास अटक केली आहे.
इंगळे व आंबेकर हे दोघेही एकाच शाळेत शिकायला होते. दोघांचे पहिले नावसुद्धा एकच आहे. दोघेही नेहमीप्रमाणे कामटवाडा परिसरात सोमवारी (दि.५) दारू पिण्यासाठी त्रिमुर्ती चौकातील एका हॉटेलमध्ये एकत्र आले. दारू पार्टी केल्यानंतर रस्त्याने जाताना नशेची झींग चढली अन् त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यावसान शिवीगाळ व हाणामारीत होऊन आंबेकर याने इंगळेच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारला. भर रस्त्यात ही घटना घडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी येथील काही नागरिकांनी तात्काळ अंबड पोलिसांना याबाबत सूचित केले. या घटनेची माहिती कळताच पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी असलेल्या इंगळे यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. इंगळे याच्या पश्चात आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे. आंबेकरच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नव्या वर्षात ही दुसरी खूनाची घटना घडली आहे.