नाशिक : येथील भगूर गावापासून पुढे असलेल्या लहवीत शिवारात गुरुवारी मध्यरात्री एक बिबट्या मांजरीचा पाठलाग करताना एका घरावर चढला पण त्याच्या ओझ्याने पत्रा तुटला अन् तो थेट स्वयंपाकघरात कोसळला. यावेळी झालेला आवाज अन् बिबट्याने फोडलेल्या डरकाळ्यांनी गाढ झोपलेले रहिवासी खडबडून जागे झाले. बिबट्याला पाहून त्यांची बोबडीच वळली. नशीब बलवत्तर म्हणून बिबट्याने कोणालाही इजा केली नाही.
नाशिक शहरासह आजूबाजूच्या गावांचा परिसर जणू बिबट्यांचा मूळ अधिवास बनत चालला आहे. नाशिककरांना बिबट्या लोकवस्तीत अथवा त्याच्याकडून कधी पशुधनावर, तर कधी मानवांवर हल्ले तसे नवीन राहिलेले नाहीत; मात्र अशा पद्धतीने घरात बिबट्या पडल्याची घटना हटके अशीच आहे. शुभम बाळू गायकवाड यांचे लहवीत गावात पत्र्याचे घर आहे. घरात त्यांच्यासह तीन महिला, तीन लहान मुले असे सात सदस्य मध्यरात्री गाढ झोपेत होते. यावेळी पत्र्यावर मोठा आवाज झाला अन् स्वयंपाक घरात अचानकपणे पावसाचे पाणी येऊ लागले. यामुळे सर्व सदस्य जागे झाले. त्यांनी घरातील दिवे सुरू केले अन् नजरेसमोर आला तो दबा धरून बसलेला बिबट्या. त्याच्या गुरगुरण्याने व डरकाळीने गायकवाड कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला.
दरम्यान, ही माहिती मिळताच नाशिक वनक्षेत्रपाल विवेक भदाणे हे रेस्क्यू पथकासह पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले. वनपाल, वनरक्षकांनी घराभोवती जाळ्या लावून विजेऱ्यांच्या प्रकाशात पाहणी केली असता घरात बिबट्या आढळला नाही. तो पुन्हा तुटलेल्या पत्र्याच्या ठिकाणाहून वर येऊन लगतच्या लष्करी हद्दीतील जंगलात पळाला.
खिडकीतून उडी घेत महिला, मुलांनी केला बचाव
रहिवाशांनी प्रसंगावधान राखत दुसऱ्या खोलीत हळूहळू प्रवेश करीत लपून बसले. काही मिनिटांतच बिबट्या धावत बैठक खोलीच्या दरवाजाजवळ आला अन् रहिवासी दरवाजा उघडून बाहेर जाणार तोच त्यांचा ‘मार्ग’ बिबट्याने बंद केला. यामुळे त्यांनी बैठक खोलीकडे न जाता मधल्या खोलीतून पाठीमागील खिडकीतून बाहेर एकापाठोपाठ उड्या घेतल्या.
लहवीत शिवार बिबट्यांचे माहेरघर
लहवीत गाव नाशिक शहरापासून सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचा परिसर शेतीचा असून, गायकवाड यांचे घर अंबड गावठा येथे आहे. जवळच वायू सेना स्टेशन असून, लष्करी हद्दीचे मोठे जंगलदेखील आहे. यामुळे या भागात वन्यप्राण्यांचा नेहमी वावर असतो.