नाशिक : 'व्हॅलेंटाईन्स डे' अवघ्या तीन दिवसांवर आला असून तरुणाईला त्याच्या सेलिब्रेशनचे वेध लागले असताना प्रेमाच्या त्रिकोणातून नाशिक येथील गोल क्लब जॉगिंग ट्रॅकवर प्रियकारासोबत फिरणाऱ्या एका तरुणीवर तिच्या ओळखीतल्या दुसऱ्या युवकाने येऊन धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.१०) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
जॉगिंग ट्रॅकवर असलेल्या नागरिकांनी यावेळी धाव घेत एका तरुणाला धरून ठेवत चोप दिला. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका तरुणाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. तसेच रक्तबंबाळ तरुणीला तातडीने जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या तरुणाने धारदार शस्त्राने वार केले तो घटनास्थळावरून फरार झाला असून मुंबई नाका पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पायल शिंदे (२०, रा. अशोकस्तंभ) असे गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणीचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. पायल ही तिच्या प्रियकरासोबत जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारत होती. यावेळी त्यांच्या ओळखीतल्या एका युवकाने तेथे येऊन तरुणीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने त्याच्याजवळच्या शस्त्राने वार केल्याने पायलच्या पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. तिची प्रकृती सध्या चिंताजनक असून सिटीस्कॅन चाचणी करत तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया केली जात आहेत. यानंतर तिच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती सांगता येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, प्रेमाच्या त्रिकोनातून हा हल्ला झाला असण्याची दाट शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. याबाबत अधिक तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.