अझहर शेख, नाशिक: आपापसांत प्रेम, बंधुभाव, करुणा व माणुसकीची शिकवण देणारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद नाशिक शहर व परिसरात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने शनिवारी (दि.22) साजरी करण्यात आली. येथील ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानात विशेष नमाजपठणाचा सोहळा पार पडला. शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी सोहळ्याचे नेतृत्व केले.
गेल्या महिनाभरापासून मुस्लीम बांधवांचा रमजान पर्व सुरू होते. यानिमित्ताने समाजबांधवांनी महिनाभर निर्जली उपवास (रोजे) केले. अल्लाह च्या उपासनेत स्वतःला अधिकाधिक व्यस्त ठेवण्यास प्राधान्य दिले. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सर्वच मशिदींमध्ये वर्दळ पहावयास मिळत होती. शुक्रवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडले आणि रमजान पर्वाची सांगता झाली.
शनिवारी ईदगाह मैदानात नमाजपठण सोहळ्याला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. आठ वाजेपासून समाजबांधव ईदगाहकडे येण्यास सुरवात झाली. मैदानाकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पारंपरिक नवीन पठाणी कुर्ता, डोक्यावर इस्लामी फेटा, टोपी पायात अशा पोशाखात नागरिक हजारोंच्या संख्येने जमले होते. मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारांभोवती शुचिर्भूत (वजु) होण्यासाठी पाण्याचे नळ तात्पुरते बसविण्यात आले होते.
सकाळी सव्वा नऊ वाजता मौलाना जफर यांनी प्रवचनाला प्रारंभ केला. त्यांनी रमजान ईद चे महत्व, ईदच्या दिवशी करावयाचे कर्तव्ये, जबाबदाऱ्याविषयी प्रकाश टाकला. दरम्यान, नमाज अदा करण्याअगोदर नागरिकांनी जकात, फित्राची (धान्यदान) रक्कम दान केली.
सकाळी सव्वा दहा वाजता खतीब ए शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी नमाजपठणाची पद्धत समजावून सांगितली आणि नमाज पठणास सुरुवात केली. विशेष दोन रकात नमाज अदा केल्यानंतर अरबी भाषेतून खतीब यांनी विशेष 'खुतबा' वाचला. यावेळी उपस्थितांनी मौन ठेवत एकाग्रतेने खुतबा ऐकला. यानंतर संपुर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी व भारताच्या उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगतीकरिता दुवा करण्यात आली. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे उपस्थितांनी सामूहिक पठण केले आणि सोहळ्याची सांगता झाली.
छत्र्यांचा घेतला आधार
उन्हाची तीव्रता वाढू लागताच जेष्ठ नागरिकांनी मैदानात छत्र्यांचा आधार घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले. वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांनी सोबत पिण्याचे पाणीही बाळगले होते.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
ईदगाह मैदानातून नमाजपठणाच्या सोहळ्यादरम्यान राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. भारताविषयीचे आपले प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत करा, देशात अमन, शांती कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन करण्यात आले.