अझहर शेख, नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सातपूरजवळ पश्चिम वनविभागाच्या नाशिक वनपरिक्षेत्राच्या गस्ती वाहन झेनॉनला (एम.एच15 ई ए 0461) विरुद्ध बाजूने भरधाव आलेल्या ट्रकनए जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनचालक शरद अस्वले, प्रोबेशनरी वनक्षेत्रपाल फटांगरे, वनरक्षक चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत.
त्र्यंबक रस्त्यावर सातपूरकडून विरुद्ध बाजूने नाशिककडे येणाऱ्या ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहतूक नियमाचे उल्लंघन करून वनविभागाच्या पेट्रोलिंग कारला समोरून धडक दिली. पेट्रोलिंग कार नाशिकहून अतिरिक्त मदत घेऊन त्र्यंबकेश्वरच्या ब्राह्मणवाडे येथे जात होती. याठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार झाल्याची घटना घडली. तेथे नाशिकहून वनाधिकारी, कर्मचारी पोहचत होते. रस्त्यात हा भीषण अपघात घडला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. अपघात इतका भयंकर होता की झेनॉन कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती नाशिकचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सातपूर वनपरिमंडळाचे वनाधिकारी कर्मचारी तसेच नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयातील अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली. खताची ओव्हरलोड वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूनं भरधाव येत होता. ट्रकचे दोन्हीही मुख्य दिवे बंद असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनास्थळी सातपूर पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.