धनंजय रिसोडकर
नाशिक : निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विषप्राशन केलेल्या युवकावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने आणि रात्रीच्या वेळी वाहनांची उपलब्धता नसल्याने त्याला तातडीने निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचविण्यासाठी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार यांनी स्वतः ५ महिन्यांची गरोदर असतानाही शासकीय रुग्णवाहिका चालवत निफाडच्या रुग्णालयात पोहोचवत रुग्णाचे प्राण वाचविले.
मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याचेवर तातडीने उपचाराची गरज होती, त्याला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. रुग्णाला तातडीने पुढील संदर्भ सेवेची आवश्यकता असताना प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे येथील वाहनचालक रजेवर असल्याने बाका प्रसंग उद्भवला होता, या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी एक स्त्री त्यातही गरोदर असूनही स्वतःचा विचार न करता आरोग्य सेवक संसारे यांना सोबत घेवून रुग्णवाहिका चालवत ग्रामीण रुग्णालय निफाड येथे तातडीने रुग्णाला पोहचविले. या धाडसी कृतीबाबत विषबाधिताचे कुटुंबिय, कर्मचारी, नागरिकांकडून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार यांच्याकडून कौतुक करण्यात येत आहे.