Nashik Lok Sabha ( Marathi News ) : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे रिंगणात असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाझे यांचे आव्हान आहे. तसंच शांतीगिरी महाराज यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नाशिकची लढत तिरंगी झाली आहे. मात्र आज मतदान प्रक्रियेदरम्यान शांतीगिरी महाराज वादात सापडले असून त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांतीगिरी महाराज यांनी मतदान केंद्रावर गेल्यानंतर इव्हीएम मशीनला हार घातला. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मागवून घेत नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
वादानंतर काय म्हणाले शांतीगिरी महाराज?
आपली भूमिका स्पष्ट करताना शांतीगिरी महाराजांनी म्हटलं आहे की, "मतदान हे अत्यंत पवित्र कार्य आहे. सर्व नागरिक हे इव्हीएमजवळ येऊन मतदान करणार आहेत. त्यामुळे सर्व मतदारांना सद्बुद्धी यावी, आपलं मत भारतमातेच्याच कामास यावं, अशा प्रकारचा विचार प्रत्येकाच्या मनात रुजावा यासाठी आम्ही हा पवित्र हार इव्हीएमला अर्पण केला आहे," असं आपली बाजू मांडताना त्यांनी म्हटलं आहे.
समर्थकांवरही गुन्हा दाखल
सोमवारी सिडको भागात मतदान सुरू असताना रायगड चौक भागात नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या काही भक्तांनी त्यांच्या बादलीची निशाणी असलेल्या मतदान स्लीप मतदारांना वाटप केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन संबंधित भक्तांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल केला.
सिडकोत सोमवारी शांततेत मतदान सुरू असताना मतदारांना चिन्ह असलेलं स्लीप देता येत नसतानाही बादली या निशाणी घेऊन उभे असलेले अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचे भक्त मतदान स्लीप बादलीची निशाणी असलेल्या स्लीपांचे वाटप करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तात्काळ शांतिगिरी महाराजांचे भक्तगण भागवत निकम ( रा.चाळीसगाव), संदीप पाटील, विष्णू करवट, पांडुरंग सदगीर या चौघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी यांच्या तक्रारीनुसार अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.