नाशिक : तपोवनाजवळील जेजुरकरमळा-टाकळी रिंगरोडवर एका पंक्चर दुकानदाराकडून दुचाकीच्या चाकात हवा भरायला उशीर लावल्याने, चार जणांनी चॉपरने हल्ला चढवून त्यास ठार मारल्याची घटना शनिवारी (दि.२९) रात्री दहा वाजाताच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१च्या पोलीस पथकाने या तीन संशयितांना अवघ्या चार तासांत बेड्या ठोकल्या आहेत.
तपोवनाच्या पाठीमागून जेजुरकर मळामार्गे टाकळीकडे जाणाऱ्या रिंगरोडवर साईराम गॅरेज आहे. या गॅरेजजवळच पंक्चरविक्रेता गुलाम मोहम्मद रब्बानी ( २७,रा.मुळ बिहार) याचे छोटेसे दुकान होते. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे रब्बानी हा एका दुसऱ्या वाहनाच्या चाकाचे पंक्चर काढत असताना तेथे संशयित यश कैलास पवार (१८,रा.द्वारका), प्रसाद रामनाथ पवार (२४,रा.शिवनगर,औरंगाबादरोड) हे दोघे त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारासह दुकानाजवळ दुचाकीने आले. त्यांनी रब्बानी यास दुचाकीच्या चाकांत हवा भरण्यास सांगितले. यावेळी त्याने पंक्चर काढत असून थोडे थांबण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून संशयितांनी चॉपर काढून रब्बानीवर हल्ला केला. वर्मी घाव लागल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने घटनास्थळ गाठले. वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ, सहायक निरिक्षक हेमंत तोडकर, उपनिरिक्षक चेतन श्रीवंत, किरण शिरसाठ, हवालदार प्रविण वाघमारे, सुरेश माळोदे आदींनी याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण प्राप्त केले. या चित्रीकरणावरू संशयितांची ओळख पटवून पथकाने तपासाचे मानवी कौशल्य वापरून तीघा संशयित हल्लेखोरांना अवघ्या चार ते पाच तासांतच ताब्यात घेतले.
एक साथीदार फरार -त्यांचा एक साथीदार फरार असून तोदेखील या गुन्ह्यात निष्पन्न होण्याची श्यक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तीघांनी खूनाच्या गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासाकरिता त्यांना आडगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. गुन्ह्यातील फरार पाटील नामक संशयित हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यातील संशयितांना सोमवारी (दि.१) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शिवीगाळ करत कानशिलात लगावली -साईराम गॅरेज जवळ पंक्चर दुकानजवळ चौघे संशयित थांबले. हवा कमी असल्याने त्यांनी रब्बानी याला हवा भरण्यास सांगितले. त्यावेळी त्याने पंक्चर काढण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एकाने रब्बानी यास शिवीगाळ करत त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर हल्लेखोर व त्याच्यात शाब्दिक वाद झाले. चौघांनी बेदम मारहाण करून हातातील चॉपरने रब्बानीच्या छातीवर वार करून धूम ठोकली. घाव वर्मी लागल्याने अतिरक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.