पिंपळगाव बसवंत : येथील न्यायालय व लगत असलेल्या पिंपळगाव हायस्कूलमधील मुलींच्या वसतिगृहाच्या परिसरात अनेक दिवसांपासून सर्पाचे वास्तव्य होते. या सर्पाचे नेहमी दर्शन होत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण होते. पिंपळगाव बसवंत अग्निशमन दलाच्या मदतीने व वन्यजीवरक्षक राजेंद्र पवार, स्वप्निल देवरे, टिल्लू बागुल यांनी गुरुवारी (दि. १९) दोन तास प्रयत्न करूनदेखील सर्प हाती लागला नाही. अखेर शुक्रवारी (दि. २०) दुपारच्या सुमारास मुलींच्या वसतिगृहात पटांगणात फिरताना मुलींनी सापाला बघितले. राजेंद्र पवार व टिल्लू बागुल यांनी तातडीने अर्धा तास प्रयत्न करीत अखेर सर्पाला पकडण्यात यश मिळवत बरणीत बंद केले. वनविभागाचे नाना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.