मनमाड : चांदवड- मनमाड- जळगाव राज्य महामार्गाचे दुपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. बुधवारी (दि. २७) दुपारी मनमाड- नांदगाव रोडवरील पानेवाडी शिवारात रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून इंधन भरलेला टँकर नाल्यामध्ये उलटला. यामुळे हजारो लिटर इंधन रस्त्यावर वाहून गेले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम प्रकल्पामधून इंधन भरून भुसावळकडे टँकर (क्र.एमएच १९ झेड ९९८८) मनमाड- नांदगाव रोडवरून जात असताना समोरून येणाऱ्या गाडीला रस्ता देण्याच्या नादात रस्त्यावरील पडलेल्या खडीवरून घसल्याने टँकर रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यांमध्ये उलटला, त्यामुळे हजारो लिटर इंधन रस्त्याने वाहू लागले.
ही घटना नागरिकांना कळताच काहींनी मिळेल त्या भांड्यांमध्ये हे इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नवीन रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे खडीचे गंज पसरलेले आहेत. त्यामुळे टँकर उलटल्याचे सांगण्यात येते. टँकर उलटल्याची घटना संबंधित कंपनीला कळल्यानंतर तातडीने कंपनीचे अधिकारी, कर्मचारी क्रेन आणि फोम बाटल्या घेऊन घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.
अपघातस्थळी कंपनीचे अधिकारी शंकर भाबड, योगेश आथर्डे, अशोक गीते, साहेबराव दराडे, कमलेश सांगळे, प्रकाश गीते आदींसह चालक-मालक यांनी मदतकार्य केले.