वाघेरा घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात
नाशिक : हरसूल-नाशिक रस्त्यावर शुक्रवारी (दि. ६) सकाळी वाघेरा घाट मार्गावरून स्वयंपाकाच्या भरलेल्या गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक प्रगतशील शेतकरी भोये यांच्या अंगणात येऊन उलटला. यावेळी भोये कुटुंबातील रेखा ऊर्फ लीना अमोल भोये (वय ३०) या अंगणात नेहमीप्रमाणे सकाळी झाडलोट करत होत्या. त्या ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या. दिवस उजाडताच झालेल्या या दुर्घटनेने पंचक्रोशी हादरली. लीना यांच्या अशा अचानकपणे ओढवलेल्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
हरसूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथून भारत गॅस कंपनीचे स्वयंपाकासाठी लागणारे गॅसने भरलेले सिलिंडर घेऊन ट्रक (एमएच१५ ईजी ७९५०) हरसूल गावातील गोदामाकडे जात होता. वाघेरा घाट उतरून आल्यानंतर अखेरच्या धोकेदायक वळणावर नाकेपाडा शिवारात ट्रकचालक अशोक पोपट शिंदे (५५, रा. शिंदे पळसे) यांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने रस्ता सोडला आणि थेट भोये यांच्या सुंदर दामोदर नर्सरीच्या अंगणात शिरला. यावेळी लीना भोये या त्यांच्या घराजवळ अंगणात सकाळी झाडू लगावत होत्या. ट्रकच्या चाकाखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला तर ट्रक येथील झाडावर जाऊन आदळला अन् उलटला. यावेळी सर्वत्र सिलिंडर पसरले. चालक अशोक शिंदे हादेखील गंभीर जखमी झाला आहे. सकाळच्या सुमारास सात वाजता झालेल्या या अपघातामुळे जोराचा आवाज झाला आणि पंचक्रोशीतील गावकरी खडबडून उठत धावत सुटले. यावेळी कोणाला काय करावे, काहीच सुचत नव्हते. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. घटनेची माहिती मिळताच हरसूल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश वारुळे हे पोलीस पथकासह तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी चालक अशोक यास बाहेर काढून हरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ट्रकखाली सापडून मृत्युमुखी पडलेल्या लीना यांच्या पश्चात पती, दोन मुली, सासू, सासरे असा परिवार आहे. या भीषण अपघाताने नाकेपाडा गावासह चिंचवड पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक गणेश वारुळे हे करीत आहेत.
--इन्फो---
भोये कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अमोल भोये हे आंबा उत्पादक म्हणून प्रसिद्ध असून, त्यांनी आंबा उत्पादनात विविध प्रयोग करून दर्जेदार पीक घेतले आहे. यामुळे आंबा सम्राट म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. ते शिक्षक असून, लीना भोये या त्यांच्या पत्नी होत. त्यांच्या अशा अचानकपणे अंगणात झालेल्या अपघाती मृत्यूने भोये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शोकाकुल वातावरणात दुपारी २ वाजता लीना भोये यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
---इन्फो---
चार वर्षांपूर्वीच्या अपघाताचे स्मरण
गुजरात येथून त्र्यंबकेश्वर देवदर्शनासाठी आलेल्या लक्झरी बसला वाघेरा घाटातील या धोकादायक वळणावर अशाच प्रकारे अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातात तेव्हा जीवितहानी टळली होती. मात्र, भाविक मोठ्या संख्येने जखमी झाले होते. या अपघाताची आठवण यावेळी ताजी झाली.
-----इन्फो-----
वाघेरा घाटमार्ग सुरक्षित होणार का?
नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक अवघड घाटांपैकी हा एक घाटमार्ग आहे. राज्य महामार्गचा दर्जा असूनदेखील या मार्गावर सुरक्षेसाठी उपाययोजना अत्यंत तोकड्या असल्याचे दिसते. बहुतांश ठिकाणी वळणावर संरक्षक कठडे लावण्यात आलेले नाहीत. तसेच सूचना फलक, रिफ्लेक्टर देखील बसविण्यात आलेले नाहीत. यामुळे हरसूल-नाशिकला जोडणारा वाघेरा घाट हा दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. नाकेपाडा ते वाघेरा आश्रमशाळेपर्यंत सुमारे सहा ते आठ किलोमीटरच्या या नागमोडी वळणाचा हा घाटमार्ग सुरक्षित करण्याची गावकऱ्यांची जुनी मागणी आहे. मात्र, याकडे संबंधित सर्वच प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
फोटो- ०६ हरसूल ॲक्सीडेंट
फोटो- ०६ रेखा भोये