शिक्षण विभागाने तांत्रिक व जाचक अटींचा आधार घेऊन तब्बल महिनाभर शाळा बंद ठेऊन आदिवासी विद्यार्थ्याचे मोठे शैक्षणिक नुकसान केले. या पार्शवभूमीवर सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात विस्थापित झालेल्या दरेवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आज जिल्हा परिषदेवर शिक्षण हक्कासाठी आक्रोश.... दप्तरे घ्या, बकऱ्या द्या असे अनोखे आंदोलन केले.
या अनोख्या आंदोलनामुळे जिल्हा परिषद प्रशासन व शिक्षण विभाग यांची धावपळ उडाली. दरेवाडी येथील प्राथमिक शाळेचा प्रश्न गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात गाजत आहे. या शाळेबाबत तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याने हा प्रश्न गंभीरच बनला आहे. मात्र या तांत्रिक वादात आदिवासी कुटुंबातील शाळकरी बालकांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. महिनाभरापासून ही बालके शिक्षणापासून वंचित आहे. आदिवासींच्या मुलांनी शिकायचेच नाही का ? असा संतप्त सवाल व्यक्त होत आहे.
यापूर्वीही विद्यार्थ्यांनी आंदोलने केली मात्र तात्पुरती उपाययोजना करून त्यांची बोळवण केली जात. श्रमजीवी संघटनेचे माजी जिल्हा पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली काळूस्ते - दरेवाडी ते नाशिक जिल्हा परिषद असा प्रवास करून हे जवळपास ४० शाळकरी विद्यार्थी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांना भेटण्यासाठी गेले. ही बाब समजताच तालुका शिक्षणाधिकारी यांनी दरेवाडीला धाव घेऊन विद्यार्थ्यांची मनधरणी केली. मात्र विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. विद्यार्थ्यांनी दप्तरे व बकऱ्याही सोबत नेल्या. शिक्षण मिळत नसेल तर दप्तरे ताब्यात घ्या अन तुमच्या हाताने आमच्या हाती बकऱ्या द्या अशी मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसोबत काही पालक व आदिवासी महिला भगिनीही सहभागी झाल्या आहेत.