नाशिक : साप हा नुसता शब्द जरी कानी पडला तरी मनुष्य घाबरतो. प्रत्यक्षात साप दिसल्यास भल्याभल्यांना घाम फुटतो. कामटवाड्यातील एका अपार्टमेंटच्या तळमजल्यात अतिविषारी सर्प प्रजाती असलेल्या घोणसच्या मादीने २४ पिल्ले जन्माला घातल्याचा प्रकार समोर आला आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांनी अपार्टमेंटमध्ये धाव घेत मादीसह पिल्लांना सुरक्षितपणे रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
कामटवाड्यातील विखे-पाटील शाळेजवळील अत्रीनंदन अपार्टमेंटमध्ये रहिवासी भूषण देवरे यांना सापाचे एक पिल्लू शुक्रवारी (दि. ९) रात्री नजरेस पडले. त्यानंतर त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या दीपक महाजन, जयेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अपार्टमेंटमध्ये धाव घेत पाहणी केली. त्यांनी सुमारे दीड ते दोन तास शोधमोहीम हाती घेतली. एका ठिकाणी मादी ही एकापेक्षा जास्त पिल्लांसह आढळून आली. पाच-दहा नव्हे तर तब्बल २४ पिल्ले आढळून आल्याचे समजताच अपार्टमेंटमधील रहिवाशांची झोप उडाली. सर्पमित्रांनी सुरक्षितरीत्या मादी व २४ नवजात पिल्लांना रेस्क्यू केले. यानंतर त्वरित वनपाल अनिल अहिरराव यांना पाटील यांनी याबाबत माहिती कळविली. दिवस उजाडताच घोणस सर्प व पिल्लांना शहरी भागातील लोकवस्तीपासून लांब जंगलात मुक्त करण्यात आले. भारतात सर्वाधिक मानवी मृत्यू घोणसच्या दंशाने होतात, असे पाटील यांनी सांगितले.
नाशिकमध्ये पहिलीच घटनाएका विषारी सर्प प्रजातीच्या मादीने अशा प्रकारे अपार्टमेंटमध्ये पिल्लांना जन्म देण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने अपार्टमेंट किंवा एखाद्या घराच्या अंगणातून सर्पांच्या पिल्लांना रेस्क्यू करण्यात आल्याचे ऐकिवात नाही.नागरिकांनी घाबरून जाऊ नयेउन्हाळा संपत असून पावसाळा तोंडावर आला आहे. हा कालावधी घोणस सर्पाच्या पिल्लांच्या जन्माचा कालावधी मानला जातो. यामुळे लोकवस्तीमध्ये साप दिसण्याचे प्रमाण वाढते. यामुळे सतर्कता बाळगावी. कुठल्याही प्रकारचा साप आपल्या अंगणात किंवा अपार्टमेंटच्या परिसरात दिसताच नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तत्काळ वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री हेल्पलाइनवर माहिती कळवावी किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांनी केले आहे.