नाशिक- राज्यात महायुतीचे बहुतांश उमेदवार घोषीत झाले. मात्र, नाशिकचे उमेदवार अद्याप ठरलेला नाही. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगनभुजबळ यांनी नाशिकसाठी चांगल्या उमेदवारांची संख्या अधिक असल्याने अद्याप उमेदवारी होत नसल्याचे मिश्कीलपणे सांगितले. दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती पवार या २ मे रोजी शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल करणार आहेत. तेा पर्यंत नाशिकचा उमेदवार घोषित झालेला असेल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
डॉ. भारती पवार यांनी मंगळवारी (दि.३०) नाशिकमध्येच छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी २ मेच्या शक्तीप्रदर्शनाबाबत चर्चा झाली. त्यानंतर भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना नाशिकच्या जागेसाठी चांगल्या इच्छुक उमेदवारांची संख्या खूप असल्याने अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. नाशिकच्या जागेसंदर्भात मी चातकासारखी वाट बघितली मात्र, युतीचा निर्णय जाहिर होत नव्हता म्हणून माघार घेतली आता एक दोन दिवसात तरी निर्णय होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
छगन भुजबळ यांनी चलबिचल होऊन नाशिकमधून माघार घेणे घाईचे ठरले, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाबाबत बोलताना त्यांनी ते त्यांचे म्हणजे अजित पवार यांचे वैयक्तीक मत असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब सानप, शहाध्यक्ष प्रशांत जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार आदी उपस्थित होते.