मनोज देवरे
कळवण (जि. नाशिक)- कळवण या आदिवासी बहुल भागात वनजमिनी तसेच वडिलोपार्जित जमिनीवरून भाऊबंदकीत वाढणाऱ्या वादामध्ये सातत्याने वाढ होत असून याकडे महसूल व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे गांडूळमोख येथील एका आदिवासी महिलेल्या झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे.
तालुक्यातील तिऱ्हळ, गांडूळमोख येथील येथील आदिवासी महिला चंद्रकला दीपक बागुल (३८) या महिलेस काठ्या - लाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली असून, त्यांना भोणा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
महिलेस डोक्यावर लाकडाच्या सहाय्याने जबरी मार लागल्यामुळे खोल जखम झाली असून, तिच्या सोबत प्रभाकर पवार, दिनेश बागुल, मुलगा सागर सुभाष बागुल यांस जबरी मारहाण करण्यात आली आहे.
या घटनेतील संशयित प्रभाकर सखाराम बागुल, ,. शामराव शिवराम बागुल, नाना शिवराम बागुल, प्रकाश पंडित बागुल, राजेंद्र प्रकाश बागुल, हेमराज प्रकाश बागुल, मनोहर मधुकर बागुल, अनिल लिलाचंद बागुल, जयराम बाबुराव बागुल, सर्व राहणार गांडूळमोख यांनी पूर्वनियोजित कट करून आम्ही सर्व सातबाराधारक यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद फुलाबाई सुभाष बागुल ( ४०) राहणार तिऱ्हळ खुर्द यांनी अभोणा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष सोनवणे आदी करीत आहेत.