संदीप झिरवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: छत्रपती संभाजीनगररोड वरून मुलासमवेत दुचाकीवरून आडगाव नाक्याकडे येताना एका गतिरोधकावर दुचाकी आदळल्याने ५६ वर्षीय महिला दुचाकीवरून खाली पडल्याने झालेल्या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.३) दुपारी घडली आहे.याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता गोवर्धन चेहरा असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. नाग चौकातील नटराज सोसायटीत राहणाऱ्या चेहरा शनिवारी मुलासमवेत छत्रपती संभाजीनगररोड रस्त्याने आडगाव नाक्याकडे दुचाकीवरून येत असताना सिद्धिविनायक चौकात गतिरोधकावर दुचाकी आदळली. त्यावेळी मागे बसलेल्या चेहरा खाली रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पंचवटी परिसरातील अनेक मुख्य रस्त्यांवर तसेच नागरी वसाहतीत विनापरवाना छोटे गतिरोधक टाकण्यात आले आहे. या गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने दुचाकी वाहनधारक गतिरोधकावर आढळून अपघात घडतात. वाहतूक रस्त्यावर असलेले धोकेदायक गतिरोधक काढून टाकावे असे न्यायालयाचे आदेश असतानाही अनेक ठिकाणच्या रस्त्यावर तसेच नागरी वसाहतीतील कॉलनी रस्त्यांवरही अनधिकृतपणे गतिरोधक टाकलेले आहेत. हे धोकादायक गतिरोधक महापालिका प्रशासन हटविणार की आणखी कोणाचा विनाकारण बळी गेल्यानंतर दखल घेणार ?असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.