संदीप झिरवाळ -पंचवटी : एका स्पोर्ट्स दुचाकीवर मित्रासोबत पाठीमागे बसून डाव्या कालव्याच्या रस्त्याने अमृतधामकडे जात असताना अचानकपणे दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटले अन् सुजय संतोष वाळवंटे (१९,रा.निलगीरी बाग) हा थेट कालव्यात पडला होता. कालव्याला आवर्तन सोडल्यामुळे पाण्यात वाहत त्याचा मृतदेह रविवारी (दि.१४) दुपारी म्हसोबा मंदिराच्या पटांगणाजवळ सापडला. मुंबईहून आई-वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या सुजयवर काळाने अशी झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी (दि.१३) रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास निलगिरी बाग वसाहतीत राहणारा सुजय हा त्याचा मित्र पुणेश सोमनाथ मुळे (१९) याच्यासोबत दुचाकीने (एमएच४६ बी.एम ६४०) निलगिरी बागेजवळच्या डाव्या कालव्यावरून अमृतधामकडे प्रवास करत होते. यावेळी पुणेशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् दुचाकी घसरून दोघे पडले. यावेळी पाठीमागे बसलेला सुजय हा कालव्यात कोसळल्याने पाटाच्या पाण्यात वाहून गेला होता. ही बाब काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी बघितली होती, यामुळे त्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिस व अग्निशमन दलाला कळविली.
अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी शनिवारी घटनास्थळी धाव घेत कालव्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र रात्री उशिरापर्यंत सुजयचा शोध लागू शकला नव्हता. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. दरम्यान रविवारी दुपारी सुजय ज्या ठिकाणी पाण्यात पडलेला होता त्याच ठिकाणी कपारीत अडकून मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या मित्र पुणेश हादेखील जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.