नाशिक : मुंबईनाका येथील सहवासनगरजवळील सार्वजनिक शौचालयाजवळ शुक्रवारी रात्री रिक्षा उभी करून त्यामध्ये साउंडसिस्टिमवर जोरजोराने गाणे वाजवत टोळके नाचत होते. यावेळी एका युवकाने त्यांना ‘येथे नाचू नका..’ असे म्हणत हटकले असता याचे निमित्त करत टोळक्याने मागील भांडणाची कुरापत काढून शस्त्राने हल्ला चढविला. यावेळी वर्मी घाव लागल्याने पियुष भीमाशंकर जाधव (२०,रा.सहवासनगर, मुंबईनाका) याचा मृत्यू झाला. मुंबईनाका पोलिसांनी याप्रकरणी दहा संशयित हल्लेखोरांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. सर्व आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहे.
मुंबईनाका पोलिस ठाणे हद्दीत शुक्रवारी (दि.१९) रात्री अकरा वाजेच्या सुमारास कालिकामाता मंदिरामागील सहवासनगर परिसरातील एका शौचालयासमोरच्या रस्त्यावर एक रिक्षा उभी करून संशयित आरोपी साहिल कृष्णा वांगडे (१८), नितीन शंकर दळवी (१८), निलेश रवी नायर (२६), ऋषिकेश संतोष जोर्वेकर (२०) यांना पोलिसांनी अटक केली आहे. यांचे साथीदार प्रवीण पुंडलिक निंबारे, निलेश पिद्दे, अजय शिंदे, रोशन माने आदींचाही गुन्ह्यात सहभाग असून त्यांचाही शोध सुरू आहे. हे सर्व हल्लेखोर सहवासनगर भागातीलच रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पियुष जाधव, प्रवीण भालेराव, यादव धर्मा लहांगे यांच्याशी वाद घातला. यावेळी त्यांनी टोळक्याला ‘येथे नाचू नका, रात्र झाली आहे, तेथून महिला ये-जा करतात, साउंडचा आवाज बंद करा...’ असे सांगितले. याचा राग धरून टोळक्याने त्यांच्याजवळी धारधार शस्त्रे काढून हल्ला चढविला. यावेळी यादव व प्रवीण हे तेथून पळून गेले अन् पियुष हा टोळक्याच्या तावडीत सापडला. त्यांनी त्याच्यावर शस्त्राने गंभीर वार करून जखमी करत पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक गिरी हे गुन्हे शोध पथकासह घटनास्थळी दाखल झाले. रात्रीतून काही हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामधील काही संशयितांवर यापुर्वीही अन्य प्रकारचे गुन्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या पियूषला शासकिय जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला हाेता. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. फिर्यादी प्रवीण संतोष भालेराव (१९) याने दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलिसांनी एकुण दहा संशयितांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरिक्षक सुधीर पाटील हे करीत आहेत.