नाशिक : अनधिकृत शाळा व बोगस विद्यार्थी संख्या दाखवून शासनाच्या अनुदानाबरोबरच अन्य आर्थिक लाभ उठविणाऱ्या शाळांच्या बोगसगिरीला चाप लावण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांची आधार जोडणी करण्यासाठी दिलेल्या मुदतीत नाशिक शहरातील सुमारे तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. सुमारे ९९ टक्के विद्यार्थ्यांकडे आधार असल्याचे तर तांत्रिक दोषामुळे एक टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी होऊ शकलेली नाही.
राज्यात गावोगावी अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, अशा शाळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शासनाकडून अनुदान लाटण्यात येते, शिवाय विद्यार्थ्यांच्या विकासाच्या योजनांसाठी मिळणारे आर्थिक लाभ देखील शाळांकडून घशात घातले जात असल्याच्या बाबी लक्षात आल्याने शाळांच्या या बोगसगिरीला चाप लावण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शासकीय, खासगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद, मनपा शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार नाशिक महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय व खासगी अशा सुमारे ५४३ शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी शासनाच्या युडायस पोर्टलवर करण्याच्या सूचना मुख्याध्यापक, शिक्षकांना दिले होते.