नाशिक: रेशनकार्डचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला आता रेशनकार्ड आधार आणि मोबाइल क्रमांकाला लिंक करावे लागणार आहे. अन्न व पुरवठा विभागाने रेशन वितरण यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांना रेशन दुकानांमध्ये जाऊन आधार लिंकींग करावे लागणार आहे. यातून गरजू लाभार्थी समोर येणार असून, बोगस रेशन कार्डधारकही समोर येणार आहेत.
स्वस्त धान्याचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळावा, याबरोबरच लाभार्थ्यांचे लिंकींग असावे, यासाठी अन्न व पुरवठा विभागाने या यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जानेवारी महिन्यात कार्डधारकांना लिंकींग करण्यासाठीचा वेळ देण्यात आला आहे. रेशन दुकानदारदेखील याबाबतची माहिती कार्डधारकांना देणार आहेत. या मोहिमेतून पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेले रेशनकार्डची मूळ संख्या समेार येणार असून, उर्वरित कार्ड बोगस म्हणून समोर येणार आहेत. लाभार्थ्यांनी रेशन कार्डला आधार व मोबाइल नंबर लिंक करणे बंधनकारक असून, त्यासाठी शासनाने ३१ जानेवारीची अंतिम मुदत दिली आहे.
जिल्ह्यात विविध योजनांचे ३७ लाख रेशनधान्य लाभार्थी आहेत. रेशन प्रणालीतील अन्नधान्याचा लाभार्थ्यांनाच पुरवठा व्हावा, यासाठी ई-पाॅस यंत्रणा अमलात आणली आहे.आता अधिक काटेकोर पडताळणीसाठी कार्डधारकांचे आधार लिंकींग केले जात आहे. जवळच्या रेशन दुकानात जाऊन लाभार्थ्यांना त्यांचे रेशन कार्ड आधार व मोबाइल नंबरशी लिंक करता येईल. १५ तालुक्यांमध्ये २ हजार ६०९ रेशन धान्य दुकाने असून, जवळपास ३८ लाख रेशन लाभार्थी आहेत. अंत्योदय योजनेचा लाभ घेणारे ८ लाख ८० हजार तर इतर योजनांचे २९ लाख लाभार्थी आहेत. जे लाभार्थी लिंक करणार नाही त्यांना १ फेब्रुवारीनंतर रेशन मिळणेच बंद होणार आहे.
--इन्फो--
अन्यथा १ फेब्रुवारीपासून रेशन बंद
जे लाभार्थी रेशन कार्डला लिंक करणार नाहीत, त्यांना १ फेब्रुवारीपासून रेशन मिळणे बंद होऊ शकते. रेशनच्या यंत्रणेत असलेल्या प्रत्येक कार्डधारकाला आता लिंकींग बंधनकारक करण्यात आल्याने रेशन बंदच्या भीतीने महिनाभरात कार्डधारकांची धावपळ होणार आहे. तांत्रिक अडचणी आल्या नाही, तर हे काम महिनाभरात पूर्ण होऊ शकते.
---कोट---
रेशनधान्याचा पुरवठा योग्य कार्डधारकांना व्हावा आणि जास्तीत जास्त लाभार्थी जोडले जावेत, यासाठी रेशन कार्ड आधार व मोबाइलनंबरशी लिंक करण्याची मोहीम सुरू केली जात आहे. लिंक न करणाऱ्या कार्डधारकांना अन्नधान्य वाटप केले जाणार नाही. लाभार्थ्यांनी रेशनच्या दुकानावर जाऊन कार्ड लिंक करून घ्यावे.
- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी.