ज्यांना कुणाचाही आधार नाही किंवा ज्यांचे पालन पोषण करण्यासाठी कुणीही नाही अशा नागरिकांना निराधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विधवा, अपंग, निराधार यांचा समावेश आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना , इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना अशा येाजनांच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावला जातो. दरमहा किमान ५०० ते १०० रुपये या योजनेत दिले जातात.
राज्य शासनाने केलेल्या घोषणेनुसार या योजनेतील लाभार्थ्यांना एक हजार रुपये दिले जाणार आहेत; मात्र अनेक लाभार्थ्यांनी नाराजीदेखील दर्शविली आहे. योजनेतील अनुदान हे आगाऊ दिले जाणार असल्याने पुढील महिन्यात योजनेचा लाभ मिळेल की नाही, याविषयी आताच शंका उपस्थित केली जात आहे.
--इन्फो--
याेजनेनिहाय लाभार्थी संख्या
संजय गांधी निराधार योजना: ३१६९२
श्रावणबाळ योजना:१,०५,६७२
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना: ६४५४३
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना:५८३५
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना: ५७३
--इन्फाे---
लाभार्थी म्हणतात...
संचारबंदीत दिव्यांगांची उपेक्षा झाली आहे. इतर बांधकाम मजूर, घरेलु कामगार, फेरीवाले यांना विशेष मदतीची घोषणा करण्यात आली आहे; मात्र शारीरिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या दिव्यांगांना संजय गांधी योजनेतून केवळ आगाऊ अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे नाराजी आहे.
- बबलू मिर्झा, दिव्यांग लाभार्थी
शासनाकडून मदतीची घाेषणा करण्यात आलेली आहे; मात्र प्रत्यक्षात मदतीच्या नावाखाली आपलीच रक्कम आपल्याला दिली जाणार आहे. त्यामुळे आगाऊ दिलेली रक्कम पुढील दोन महिन्यात मिळेल की नाही, याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही.
- नारायण कुयटे, लाभार्थी.
संचारबंदीच्या काळात आगाऊ रक्कम मिळणार असल्याने शासनाचे आभार मानले पाहिजे. योजनेतील लाभासाठी अगोदरच तीन ते चार महिने वाट पाहावी लागते. त्यामुळे आगाऊ दोन महिन्यांची रक्कम मिळणार असल्याने त्या रकमेचा नक्कीच आधार होणार आहे.
- कैलास वारुंगसे, लाभार्थी.
संचारबंदीमुळे शासकीय कार्यालयात जाता येणार नाही. अनुदानासाठी नेहमीच शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. पुढील दोन महिन्यांची रक्कम आगाऊ मिळणार असली तरी त्यामुळे धावपळ वाचणार आहे. हातात असलेले दोन पैसे या काळात लाभदायकच ठरतील.
- कौशल्याबाई रत्नाकर, लाभार्थी.
राज्य शासनाने निराधार योजनेतील गरिबांना एक हजार रुपये देण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात अमलात लवकर यावी, अशी अपेक्षा आहे. कार्यालयात येण्यासाठी या काळात मोठी कसरत करावी लागेल. थेट खात्यात अनुदान जमा झाल्यामुळे धावपळ टळणार आहे.
- पवळाबाई गवारे. लाभार्थी.