त्र्यंबकेश्वर : तळेगाव (अं.) येथील सुपाच्या डोंगरपायथ्याशी डुंबरा ओहोळाच्या कडेला असलेल्या दारूच्या अनेक भड्ड्या त्र्यंबक पोलिसांनी नष्ट करून सुमारे ९०० लिटर गावठी दारू नष्ट केली. पोलिसांच्या या विशेष कामगिरीबद्दल तळेगाव (अं.) गावातील नागरिकांनी स्वागत केले असून, विशेषत: महिलावर्गाने समाधानाचा विश्वास टाकला आहे तर पोलिसांना धन्यवाद दिले आहे. यासंदर्भात ग्रामसभेने प्रस्तावदेखील मंजूर केला होता.या प्रस्तावाची प्रत त्र्यंबक पोलिसांना प्राप्त होताच नव्यानेच दाखल झालेले धडाडीचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी कारवाई करून आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकला. या कारवाईत १५ लिटर क्षमतेचे गावठी दारूचे पत्र्याचे डबे, या डब्यात गावठी दारू तयार करण्याचे रसायन होते. असे एकूण ९०० लिटर दारूसह साहित्य जप्त करून पोलिसांनी ताब्यात घेतले तर गावठी दारू नष्ट करण्यात आली. संशयित आरोपी मात्र मिळून आले नाहीत. मात्र आपण त्यांना लवकरच ताब्यात घेऊ, असे पोलिसांनी सांगितले.पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मेहेरे, बोराडे, हवालदार रमेश पाटील, कोरडे, महिला कॉन्स्टेबल कुमावत, होमगार्ड खुरकुटे अशा पथकाने ही कारवाई पार पाडली.दरम्यान, दारूविक्री समर्थकांनी खबर देणाऱ्याला दमदाटी केली व गावात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याने पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)
तळेगाव येथे दारूअड्ड्यावर धाड
By admin | Published: September 10, 2014 10:14 PM