नाशिक : तपोवनातील गोदावरी-कपिला संगमावर असलेल्या वृंदावन गोसेवा संस्था गोशाळेत भटक्या बेवारस गायींचे पालनपोषण केले जाते. या गोशाळेमधील एका गायीची प्रकृती रविवारी (दि.१४) अचानकपणे गंभीर झाल्याने गोशाळाचालकांनी पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांना पाचारण केले. त्यांनी तातडीने गायीची तपासणी करत पोटाची शस्त्रक्रिया क रण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान गायीच्या पोटातून प्लॅस्टिकसह लोखंडी लहान खिळे, तारेचे तुकडे, कापड, बारदान एवढेच नव्हे तर भींतीवरील घड्याळाचे सेलदेखील पोटातून काढण्यास वैद्यकिय चमूला यश आल्याने गायीला जीवदान लाभले.सरकारकडून प्लॅस्टिकबंदी जाहीर करण्यात आली असली तरीदेखील प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे केला जात आहे. त्याचप्रमाणे नागरिकांकडून कुठल्याहीप्रकारची दुरदृष्टी न ठेवता सर्रासपणे उघड्यावर प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये नासलेले अन्नपदार्थ जनावरांसाठी टाकले जातात तसेच इलेक्ट्रॉनिक कचराही उघड्यावर फेकला जातो. यामुळे बेवारस भटक्या गायींचा जीव धोक्यात सापडत आहे. जुने नाशिक परिसरातील भद्रकाली, सारडासर्कल या भागात भटक्या गायींचा ठिय्या नेहमीच नजरेस पडतो. आठवडाभरापुर्वीच वृंदावन गोशाळेकडे महापालिकेच्या पशुवैद्यकिय विभागाकडून बेवारस भटक्या १२ गायींना सुपुर्द करण्यात आले. यापैकी एका ७ वर्षीय गायीचे पोट प्रमाणापेक्षा अधिक फुगले होते आणि तीने कुठल्याहीप्रकारचा चारा खाणे सोडल्याने गोशाळेचे संचालक राजेंद्र कुलथे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी अशोकस्तंभ येथील पशुसंवर्धन सह आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून मदत मागितली. पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. संदीप पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ गोशाळा गाठली. गायीची तपासणी केली असता तीची प्रकृती वेगाने खालावत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अतीजोखमीची व तातडीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय तत्काळ घेतला. गोशाळेचे सेवकांच्या मदतीने त्यांनी शस्त्रक्रियेची तयारी करत या आजारी गायीवर शस्त्रक्रिया सुरू केली. तिच्या पोटातून दोन टोपल्या भरून तब्बल ३३ किलो इतका कचरा यावेळी डॉक्टरांनी बाहेर काढून तीला जीवदान दिले.तीन गायींवर संकट कायममागील काही दिवसांपासून येथील तीन ते चार गायी कुठल्याहीप्रकारचे खाद्य किंवा चारा सेवन करत नसल्याचे गोशाला चालकांच्या निदर्शनास आले आहे. डॉ. पवार यांनी सर्व गायींची तपासणी केली असून यापैकी एका गायीला धनुर्वादचा आजार असल्याचे लक्षात आले तर अन्य दोन गायींच्या पोटातसुध्दा अशाप्रकारे प्लॅस्टिक कचरा असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या गायींची प्रकृती खूप चिंताजनक नसल्याने प्रथम गंभीर प्रकृती असलेल्या गायीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. येत्या दोन दिवसांत उर्वरित दोन्ही गायींवर शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती कुलथे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
मागील तीन वर्षांपासून आमच्या संस्थेमार्फत बेवारस गायींचा सांभाळ केला जात आहे. मनपाकडून मागील आठवड्यात आलेल्या गायींपैकी एका गायीच्या पोटातून निघालेला ३३किलो इतका प्लॅस्टिक व अन्य कचरा बघून मोठा हादरा बसला. नागरिकांनी अशा पध्दतीने प्लॅस्टिक पिशवीत अन्नपदार्थ तसेच कचºयात टाकाऊ सेल, ब्लेड, लोखंडी वस्तू टाकू नये. ज्या भाकड गायी झाल्या असतील त्यांना मालकांनी बेवारस सोडू नये तर गोशाळेकडे सुपुर्द करावे.-राजेंद्र कुलथे, संचालक वृंदावन गोसेवा संस्था