नाशिक : शहरातील विविध ठिकाणी बेकायदेशीर धार्मिक स्थळे आहेत. परंतु महापालिका प्रशासनाने मोजकीच स्थळे हटविली आहेत. कामटवाडे भागात दोन बेकायदा धार्मिक स्थळे खुल्या जागेत असून, ती मनपा कर्मचाºयांशी संबंधित असल्याने ती काढण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे केली आहे. महापालिकेच्या वतीने शहरात बेकायदा धार्मिक स्थळांच्या विरोधात अतिक्रमण मोहीम सुरू केली तेव्हादेखील याबाबत तक्रार करण्यात आली आणि सोसायटीच्या खुल्या जागेतील धार्मिक स्थळे हटवावी, अशी मागणी करण्यात आली होती. आयुक्त अभिषेक कृष्ण यांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी बेकायदा धार्मिक स्थळांना दिलेली नोटीस या ठिकाणीदेखील लावण्यास सांगितले होते. परंतु मोहीम संपत आली तरी आयुक्तांच्या आदेशांचे पालन न करताच त्या धर्मस्थळांना संरक्षण दिले जात असल्याचे नागरिकांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उलट आता खुल्या जागेत धार्मिक स्थळे बांधण्यास परवानगी देण्याबाबत महासभेत ठराव होणार असल्याचे सांगून अधिकारीच बेकायदा बांधकाम करणाºयांना पाठीशी घालत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
नाशिक शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांना अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:03 AM