मालेगाव शहरात १ लाख २० हजार मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ताधारकांकडून घरपट्टी १२ कोटी रुपये तर पाणीपट्टी १३ कोटी रुपये थकीत आहे. ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेने ३ कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करत व्याजावर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ८० टक्के वसुली होईल, असा दावा मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात नागरी सुविधा केंद्रावर ही सूट दिली जाणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत भरणाऱ्या मालमत्ताधारकाला १०० टक्के, १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान भरणाऱ्या मालमत्ताधारकाला ७५ टक्के, १६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान भरणाऱ्या मालमत्ताधारकास ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. विहीत मुदतीत मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. यासाठी जप्ती पथके स्थापन होणार आहेत. शहरातील भ्रमणध्वनी मनोरा कंपन्यांकडे सुमारे ३ कोटी रुपये थकबाकी आहे. संबंधित कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी कर न भरल्यास ८० भ्रमणध्वनी मनोरे सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. २ ते २४ टक्क्यापर्यंत ही सूट दिली जाणार आहे. नागरिकांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त कासार यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला लेखापरीक्षक राजू खैरनार, नगरसचिव पंकज सोनवणे, प्रभाग अधिकारी हरीश डिंबर आदी उपस्थित होते.
चौकट :
महापालिकेच्या गेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कोरोना काळातील तीन महिन्याचा मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला होता. प्रशासनाने मंजूर झालेला ठराव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता; मात्र शासनाने या ठरावाची मान्यता नाकारली आहे. परिणामी कोरोना काळातील मालमत्ता कर नागरिकांना भरावाच लागणार आहे.