संजय पाठक, नाशिक- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीची ज्योत जेथे पेटवली त्या नाशिकमधील अभिनव भारतचे कार्यालय असलेला वाडा अखेरीस शासनाने जमीन दोस्त केले आहे. अभिनव भारत स्मारकाचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी हा जुना वाडा तोडण्यात आला आहे.
सावरकर यांच्या स्मृती दिनी हा प्रकार उघड झाल्याने सावरकर प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. दुसरीकडे हा वाडा अत्यंत जुना होता, त्यामुळे तो तोडून पुन्हा अशाच प्रकारच्या वाड्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.
नाशिक शहरातील दुर्गा मंगल कार्यालयाजवळ तीळभांडेश्वर लेन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत चळवळ ज्या वाड्यात चालवली होती त्या वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात येणार आहेत. 1899 ते 1909 या कालावधीत अभिनव भारतच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या गुप्त चळवळी चालवल्या गेल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाल्यानंतर चळवळीचे काम थंडावले होते.
दरम्यान, अभिनव भारत या वास्तूत अनेक भाडेकरू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यालय होते या ठिकाणी अभिनव भारत हे स्मारक तयार करण्यासाठी सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे त्यामुळे हा वाडा पाडण्यात आला असून पूर्वीप्रमाणेच नवीन वाडा तयार करण्यात येणार आहे. या वाड्यात अंदमान येथील काळकोठडीची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे तसेच सावरकरांच्या जीवनावरील लघुपट, साहित्य आणि सावरकरांच्या जीवनावरील प्रश्नांना उत्तरे देणारा रोबोट अशा अनेक प्रकारच्या कल्पना साकारण्यात येणार आहे असे आमदार फरांदे यांनी सांगितले. दरम्यान अशा प्रकारे वाडा तोडून त्या ठिकाणी नवा वाडा बांधण्यावरून वाद सुरू झाला आहे. नाशिक मधील काही वास्तू तज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी या प्रकारामुळे धक्का बसल्याचे सांगितले. सावरकर कुटुंबीयांना अशा प्रकारे माहिती न देता वाडा पाडणे चुकीचे आहे असे त्यांनी सांगितले. मुळातच शासनाने केवळ निधी पुरवण्यापुरतीच स्मारकाबाबत भूमिका बजवावी, क्रांतिकारकांची स्मारक ही त्यांच्या वारसांच्या ताब्यात दिली पाहिजे तर त्याची ते उचित देखभाल करतात असे खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत होते असेही रणजीत सावरकर म्हणाले.