चंदीगड : ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याने कार विकल्यानंतर आरसी आणि गाडीची मालकी ट्रान्सफर न केल्याने मोठ्या संकटात सापडला आहे. या कारने एका अपघातावेळी मंगत सिंग आणि गुरसेवक सिंग या पितापुत्रांना आपले प्राण गमवावे लागले होते. आता त्यांच्या परिवाराने बिंद्राच्याविरोधात 70 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. या प्रकरणाची सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे.
हा अपघात 10 मार्चला झाला होता. मुखत्यार सिंग यांनी 50 लाख रुपये मुलासाठी आणि 20 लाख रुपयांची भरपाई नातवाच्या मृत्यूसाठी मागितली आहे. मंगतसिंग हा महिन्याला 10 हजार रुपये कमावत होता, असा दावा त्यांनी केला आहे.
10 मार्च 2018 मध्ये मंगत सिंग हा त्याच्या मुलासोबत दुचाकीवरून जात होता. गुरुसेवक हा दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. यावेळी व्होल्वो कारने ओव्हरटेक करताना पाठीमागून त्यांना उडविले. यामध्ये दोघेही जागीच ठार झाले. ही कार ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याच्या नावावर होती. यामुळे त्यालाच अॅक्सिडेंट क्लेममध्ये विरोधी पक्ष बनविण्यात आले आहे.
याशिवाय गाडी चालविणार बंटी आणि दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीवरही दावा ठोकण्यात आला आहे. या अपघातानंतर बिंद्राच्या वडीलांनी दिलेल्या जबाबात ही कार विकल्याचे सांगितले होते. मात्र, तपासामध्ये ही कार अभिनव बिंद्राच्याच नावावर असल्याचे समोर आले.