शैलेश कर्पे
सिन्नर (नाशिक) : जिल्ह्यातील सिन्नर येथील पुरातन श्री गोंदेश्वर मंदिरात चार दिवसांपासून सूर्याची किरणे शिवपिंडीला अभिषेक घालत असल्याचे दृश्य आहे. या किरणोत्सवाचे आकर्षण असल्याने सूर्योदयाच्या वेळी भाविक याठिकाणी किरणोत्सव पाहण्यासाठी गर्दी करतात. येथील पुरातन गोंदेश्वर मंदिरात मध्यभागी मुख्य शिवाचे मंदिर आणि बाजूला चार मंदिरे असे पंचायतन पद्धतीचे कोरीव शिल्पकाम असलेले ऐतिहासिक मंदिर आहे. मंदिरात सप्टेंबर व मार्च या दोन महिन्यात म्हणजेच वर्षातून दोनवेळा मुख्य पिंडीवर किरणोत्सव होत असल्याचे इतिहासाचे अभ्यासक दत्ताजी शेळके यांनी सांगितले.
सलग चार दिवस सूर्य उगवल्यानंतरची काही मिनिटे सूर्यकिरणे मंदिरात प्रवेश करतात व शिवपिंडीवर त्यांचा अभिषेक झाल्यानंतरचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरते. हा किरणोत्सव व्हावा, यासाठी शास्त्रीय पद्धतीने मंदिराची व गाभाऱ्याची उभारणी करण्यात आल्याचे यावरून सिद्ध होते.