नाशिक : देशभरात सीएए व एनआरसी कायद्यावरून विरोध व समर्थनार्थ आंदोलने आणि सभा सुरू असताना नाशिकमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व छात्रभारतीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचा प्रकार घडला. अभाविपचे कार्यकर्ते महाविद्यालयाच्या आवारात सीएए व एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवित असताना छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी अभाविपवर जमावबंदीचे उल्लंघन करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा आरोप करीत विरोध केल्याने दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात गुरुवारी (दि. २३) अभाविपचे कार्यकर्ते सीएए व एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवित असताना हा प्रकार घडला. देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्यकांना भारतीय नागरिकत्व मिळणार असल्याविषयी अभाविपतर्फे विद्यार्थ्यांना माहिती देऊन सीएए, एनआरसी समर्थनार्थ त्यांच्या स्वाक्षºया घेण्यात येत असताना छात्रभारतीच्या काही कार्यकर्त्यांनी मोहीम थांबविण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आला. तर शहरात जमावबंदी लागू असताना अभाविपने विनापरवानगी महाविद्यालयात घुसून सीएए व एनआरसी समर्थनाचे बॅनर झळकावत विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट समाजविरोधी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होऊन अभाविप व छात्रभारतीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने महाविद्यालयाच्या परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, ही गोष्ट महाविद्यालय प्रशासनाच्या लक्षात येताच प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी मध्यस्थी करीत दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.
केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत जरी पारीत केला असला तरी तो राज्यघटनेच्या मूळ उद्दिष्टांशी विसंगत आहे. भारतीय घटनेच्या १४व्या कलमानुसार जात, लिंग, वंश आणि धर्म या आधारे भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. या कायद्यामुळे केवळ नागरिकत्वच नव्हे, तर राज्यघटना आणि लोकशाहीची मूल्ये धोक्यात आली आहेत. अभाविप स्वाक्षरी मोहीम राबवत असताना सदर बॅनरवर विशिष्ट धर्माचा उल्लेख केलेला असून, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जात-धर्माचा प्रचार करणे व विद्यार्थ्यांमध्ये जातीय तेढ निर्माण करणे चुकीचे आहे.- समाधान बागुल, राज्य कार्यकारिणी सदस्य, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र
सीएए, एनआरसी समर्थनार्थ स्वाक्षरी अभियानात विद्यार्थी, प्राध्यापक व महाविद्यालयांच्या कर्मचाºयांनीही प्रतिसाद दिला. ही स्वाक्षरी मोहीम छात्रभारतीने हाणून पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. सीएए, एनआरसी कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही. - अथर्व कुलकर्णी, महानगर मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद