नाशिक : नाशिकमध्ये अत्युच्च दर्जाच्या शिक्षणाचा पायाभूत ढाचा सर्वार्थाने सुसज्ज आहे. महानगरात कार्यरत शैक्षणिक संस्थांनी विश्वातील अत्याधुनिक ज्ञानशाखांची सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध करून देण्यात पुढाकारदेखील घेतला आहे. त्यामुळे आरोग्यदायक वातावरण असलेल्या या शहरात पुण्याप्रमाणेच शिक्षणाचे माहेरघर म्हणजेच आधुनिक परिभाषेत शैक्षणिक हब बनण्याची क्षमता असून, भविष्यात नाशिकचा विकास त्या दृष्टीने होऊ शकणार असल्याचा विश्वास नाशिकमधील शिक्षण संस्थांच्या प्रमुखांनी व्यक्त केला.
नाशिक लोकमतच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित संवाद कार्यक्रमात नाशिकच्या प्रमुख शिक्षण संस्थांच्या धुरिणांनी संवाद साधला. त्यात मविप्र सरचिटणीस नीलिमाताई पवार, संदीप युनिव्हर्सिटीचे चेअरमन संदीप झा, एमईटी भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रशासक शेफाली भुजबळ, गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे सीईओ परमिंदरसिंग आणि नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र निकम यांनी नाशिकच्या शैक्षणिक वाटचालीबाबत मनमोकळा संवाद साधला. मविप्र, नाएसोसारख्या संस्थांनी रेकॉर्डेड व्हिडिओद्वारे ते दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी कोविड काळातील नुकसान भरून निघण्यासाठी सर्वच शिक्षण संस्थांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असल्याचे नमूद करण्यात आले. या काळातील सर्वोत्तम बाब म्हणजे सर्वच शिक्षण संस्थांचे शिक्षक टेक्नोसॅव्ही झाले असून, जिल्ह्यातील सुमारे तीन चतुर्थांश बालकांनी ऑनलाईन शिक्षणात सहभाग नोंदविला असून, ही भविष्याच्या दृष्टीने खूप मोठी उपलब्धी असल्याचे नीलिमाताईंनी सांगितले. नाशिकच्या जुन्या शिक्षण संस्थांनी शिक्षण चळवळ रुजविल्यानेच नाशिकच्या साक्षरतेचे प्रमाण ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, यापुढे केवळ शिक्षित नव्हे, तर शेअरिंग, केअरिंग यासारख्या गुणांनी संपन्न सुशिक्षित विद्यार्थी घडविण्यावर भर द्यावा लागणार असल्याचे नीलिमाताईंनी नमूद केले. भविष्यात सर्वच शिक्षण संस्थांना विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानणारे शिक्षक तसेच त्याच प्रकारची शिक्षण प्रणाली राबविण्यावर भर द्यावा लागणार असल्याचे परमिंदरसिंग यांनी सांगितले. अद्यापही अभ्यासक्रमातून दिले जाणारे शिक्षण आणि उद्योगांना, कंपन्यांना अपेक्षित मनुष्यबळाच्या पुरवठ्यात प्रत्यक्षात मोठी तफावत आहे. सर्व शिक्षण संस्थांना आता मोठमोठ्या मल्टिनॅशनल कंपन्यांना अपेक्षित असलेले मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रॅक्टिकल आणि फिल्डवरील ज्ञान मिळवून देण्यावर भर द्यावा लागणार असल्याचे परमिंदरसिंग यांनी नमूद केले. संदीप युनिव्हर्सिटीचे संदीप झा यांनी नाशिकच्या क्षमतेइतका नाशिकचा विकास आणि शैक्षणिक वाढ अद्यापही झाली नसल्याचे सांगितले. पुण्याप्रमाणेच नाशिक हा शिक्षणाचा एक ब्रॅंड म्हणून विकसित होण्याची गरज असून, आपण पुण्यापेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नसून केवळ सुनियोजित ब्रॅंडिंगची नितांत आवश्यकता असल्याचेही झा यांनी नमूद केले. शेफाली भुजबळ यांनी आधुनिक शिक्षणात विद्यार्थ्यांना मल्टी डिसिप्लिनरी कोर्सेसचा पर्याय उपलब्ध करायला हवा असल्याचे सांगितले. बाल्यावस्थेतील शिक्षणापासूनच मुलांमध्ये संस्कृती, मूल्य, इतिहास, तत्त्व या सर्व बाबी रुजविण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच सेवा क्षेत्राशी निगडित उद्योग अधिक प्रमाणात नाशिकला येण्याची गरज असून, सर्व प्रकारच्या उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ नाशिकमध्येच उपलब्ध करून देण्यावर सर्व शैैक्षणिक संस्थांना भर द्यावा लागणार असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. तर कोरोनानंतरच्या वातावरणात कदाचित विश्वाचे आर्थिक नुकसान भरून निघेल, मात्र विशेषत्वे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान भरून निघण्यास सर्व स्तरावरून प्रयत्न करावे लागणार असल्याचे मत निकम यांनी व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी केले.
फोटो
पीएचएनजे १०८